जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । देशभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचे संकट मध्यंतरी काहीसे कमी झाले होते मात्र गेल्या काही दिवसापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहे. कोरोनाचे संकट आता फारसे गांभीर्याने घेतले जात नसले तरी दुसराच एक धोका राज्यावर येऊ पाहत आहे. गेल्या काही दिवसातील आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्रात (Maharashtra) स्वाईन फ्लूच्या (swine flu) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईत (Mumbai) रुग्णांची संख्या सर्वाधिक 43 अशी आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 7 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. काही वर्षापूर्वी डुकरांमुळे या आजाराच्या फैलावाची सुरुवात झाली होती, त्यानंतर जगभरात हा आजार पसरला होता.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत राज्यात स्वाईन फ्लूचे एकूण 142 रुग्ण सापडले आहेत. गेल्या तीन वर्षांत मुंबईत H1N1 विषाणू (स्वाईन फ्लू) मुळे एकही मृत्यू झालेला नाही, मात्र 2022 या वर्षांत मुंबईत रुग्णांची संख्या सर्वात अधिक, 43 इतकी आहे. 1 जानेवारी 2022 ते 21 जुलै 2022 या कालावधीतील आढळलेल्या रुग्णांची माहिती समोर आली असून राज्यात 142 रुग्ण स्वाईन फ्लूने ग्रस्त आहेत. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 43 रुग्ण, पुण्यात 23 (मृत्यू 2), पालघर 22, नाशिक 17, नागपूर 14, कोल्हापूर 14 ( मृत्यू 3), ठाण्यात 7 ( मृत्यू 2) आणि कल्याण – डोंबिवलीत प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण सापडले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.
स्वाईन फ्लू म्हणजे काय?
स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून H1N1 व्हायरसमुळे त्याची लागण होते. 2009 साली WHO ने हा रोग संसर्गजन्य असल्याचे जाहीर केले होते. हा आजार केवळ माणसांमुळे नव्हे तर प्राण्यांमुळे देखील होतो. काही वर्षापूर्वी स्वाईन फ्ल्यूची मोठी लाट आली होती. ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झाली असेल, तो शिंकला अथवा खोकला, तर त्यातून या आजाराचे विषाणू हवेत पसरतात. याचे विषाणू हवेत 8 तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. ह्या विषाणूंचा निरोगी अथवा स्वस्थ व्यक्तीचे डोळे, नाक, तोंड अथवा त्वचेशी संपर्क आला, तर विषाणूंचे संक्रमण होऊन त्या व्यक्तीलाही स्वाईन फ्लूची लागण होते.
हे देखील वाचा : Corona update : भारतात एकाच दिवशी आढळले 4,518 नवीन रुग्ण, ९ रुग्णांचा मृत्यू
जाणून घ्या ‘स्वाईन फ्ल्यू’ची लक्षणे
स्वाईन फ्लूची लक्षणे सामान्य तापासारखीच असतात. खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे. 65 वर्षांवरील नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला, तसेच मधुमेह, किडनीचे विकार असे आजार असणाऱ्यांना स्वाईन फ्लूची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. दुखणे अंगावर काढल्यास आजार बळावून मृत्यूचा धोका असतो.
- ताप येणे, हुडहुडी भरणे वा थंड वाजणे.
- सर्दी होऊन नाक वाहते राहणे.
- खोकला, घशात खवखव वा दुखणे.
- अंगदुखी तसेच डोके दुखणे.
- पोटात दुखणे.
- मळमळ वा उलटी होणे.
अशी घ्यावी काळजी
स्वाईन फ्ल्यूपासून बचावासाठी आपण योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यात आपले हात वारंवार साबण अथवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. तोंडावर मास्क वापरावा. खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. खोकला अथवा शिंक आल्यास, त्यानंतर त्वरित हात स्वच्छ धुवावेत. सर्दी-खोकला झाला असल्यास बाहेर, गर्दीच्या ठिकाणी न जाता घरीच थांबावे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत, अंगावर दुखणे काढू नये. स्वाईन फ्लूची लागण झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. पूर्ण बेडरेस्ट घ्या. औषधांचा कोर्स पूर्ण करा, उपचार मध्येच सोडू नका. शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत पाणी अथवा फळांचा रस प्या, अशी दक्षता घ्यायला हवी.