Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! आज कुठे ऑरेंज तर कुठे रेड अलर्ट? जाणून घ्या

जुलै 14, 2022 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतेय. तर अनेक तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कायम असणार असून आज माहिती हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाची इशारा देण्यात आला आहे.

rain 1 2 jpg webp

या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी
आज हवामान खात्याकडून नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, ठाणे, उपनगरं, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर नंदूरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासुन पावसाची संततधार सुरु आहे. आज गुरुवारी जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात यंदा जुलैत १३ पैकी १० दिवसांत १०१ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी जुलैअखेरपर्यंत ११५.३ मिलिमीटर पाऊस झाला हाेता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसात सातत्य राहिल्याने त्याचा खरीप हंगामाला दिलासा मिळाला. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठा हळूहळू वाढू लागला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now