जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । शिवसेनेच्या कार्यकाळातील सर्वात मोठे बंद एकनाथ शिंदे यांनी पुकारले आहे. एकनाथ शिंदे यांनी ५२ आमदारांसह भाजपशी घरोबा करीत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर सर्व आमदार सहभागी झाले आहेत. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी शनिवारी जळगाव शहरात भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात निघालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बंडखोरांना शिव्यांची लाखोली वाहत शिवसैनिकांनी त्यांचे पुतळे दहन केले.
शिवसेनेशी बंडखोरी करणारे जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ शनिवारी जळगाव जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात महानगराध्यक्ष शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, डॉ.हर्षल माने, नितीन लढ्ढा, सुनील महाजन, गजानन मालपुरे, कुलभूषण पाटील, विराज कावडीया, किशोर भोसले, जाकीर पठाण, प्रशांत सुरळकर, मंगला बारी आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चित्रा चौकातून दुपारी भर पावसात मोर्चाला सुरुवात झाली. चित्र चौक, टॉवर चौक, नेहरू चौक, शिवतीर्थ मैदान, बेंडाळे चौक, नेरी नाकामार्गे मोर्चा स्मशानभूमीजवळ पोहचला. स्मशानभूमीच्या बाहेर संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुढे मोर्चा मार्गस्थ होऊन अजिंठा चौफुली येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चात सहभागी संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, उद्धव साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, बंडखोरांच्या बैलाला रे भो.. घोडे लावा यांना घोडे लावा, उद्धव साहेबांचा विजय असो, आदित्य साहेबांचा विजय असो अशा घोषणा देत शिवसैनिकांनी बंडखोरांविरुद्ध आक्रोश करीत शिवसेना पक्षाचे समर्थन केले.
हे देखील वाचा : हलाल आणि झटका मांस म्हणजे काय?
मोर्चाच्या समारोपप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी संवाद साधताना, स्व.बाळासाहेबांची शिवसैनिक मानून मी सर्वांशी संवाद साधते अशी सुरुवात केली. आजचा आपला मोर्चा नाही हा आक्रोश आहे. आपला जोश केवळ आजच नाही तर नेहमी टिकला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत आपला आक्रोश दिसला पाहिजे. आपण सर्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण आपली ताकद दाखवून दिली आहे. पुढे देखील आपली ताकद अशी कायम ठेवा, असे आवाहन महापौरांनी केले.
गुलाबराव वाघ म्हणाले, शिवसेना आणि आम जनतेच्या बळावर आम्ही निवडून येणार आहोत. गुलाबराव तुम्ही ढाण्या वाघ असाल तर राजीनामा द्या आणि निवडून या, असे आव्हान वाघ यांनी केले. तसेच घाबरू नका गुलाबराव किती वाघ असेल, कुणी मंत्री असेल तरी मी तुमच्या सोबत आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मोर्चा सुरु असताना मला एकनाथ शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाचा धमकीसाठी फोन आला. मी त्याला सांगितले हिम्मत असेल तर इकडे ये. पोलीस प्रशासनांनी अशा धमक्या देणाऱ्यांना अटक करावी, असे ते म्हणाले. डॉ.हर्षल माने यांनी, शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्यांना जिल्ह्यात घुसू द्यायचे नाही. त्यांच्या घरावर हल्ले करायचे. शिवसेना काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे, असे सांगितले.
रावेर संपर्क प्रमुख विलास पारकर म्हणाले, बंडखोरांनी शिवसेना आणि मतदारांचा अपमान केला आहे. लोकशाहीचा खून केला आहे. शिवसेना एक विचार आहे. बाळासाहेबांची संघटना आहे, असे गुलाबराव आम्ही दहा जन्माला घालू शकतो. गुलाबरावांवर आमचा पक्ष उभा नाही. बंडखोर स्वतःच्या कर्माने मरणार आहेत त्यांनी तुम्ही मारू नका, अशी भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आजचा आक्रोश यांना भोगावा लागणार आहे. हाणामारी करून नाही तर मतदानातून यांना आपली ताकद दाखवू. बंडखोर सुखाने झोप कधीच घेऊ शकत नाही. प्रत्येक शिवसैनिकाने आज लढा दिला आहे. बंडखोरांच्या घरावर हल्ले करण्याची आपल्याला गरज नाही तर त्यांना शरमेने मान खाली घालायला लावायला भाग पाडा. येणाऱ्या काळात सूर्य आपलाच उगवलेला असल्याचे आपणास पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलं इग्नोर
जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत म्हणाले, आजचा मोर्चा आणि शिवसैनिकांची गर्दी दाखवतो हा आज लोकांचा आक्रोश आहे. मोर्चात जिल्ह्यातील सर्व आमदारांचे पुतळे दहन करण्यात आले. बंडखोरी करणाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या निवडणुकीत जनतेची ताकद दिसून येईल. शिवसेना तुम्हाला निवडून देते, पैसे निवडून देत नाही. जर कुणाला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जिल्ह्यात फिरता येणार नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा. आपण सर्व एकजूट कायम ठेवा आणि आपण एकत्र आहोत हे दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. तसेच आज त्यांचा वेळ सुरु आहे आपला काळ येईल. आमच्यासोबत कोण आले ते बघायचे, कोण आले नाही त्यांचा विचार करायचा नाही. बंडखोरांची साथ देणाऱ्यांची लवकरच पक्षातून हकालपट्टी होईल, असे संजय सावंत यांनी स्पष्ट केले.
अजिंठा चौफुली येथे राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. भर पावसात दिसून आलेल्या गर्दीमुळे खरा शिवसैनिक आज देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे पाहावयास मिळाले.
पहा व्हिडीओ प्रक्षेपण :