जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । किनगावच्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी अटकेत असलेले सिरीयल किलरविरुद्ध खुनाचा एक गुन्हा दाखल असून आणखी दोन गुन्ह्यांची आरोपीने कबुली दिल्याने अन्य दोन गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, पहिल्या गुन्ह्यात १जुलैपर्यंतची पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपीला नव्याने दाखल गुन्ह्यात पोलिस ताब्यात घेणार आहेत.
मराबाई सखाराम कोळी (वय ७५ रा. किनगाव ता. यावल) या वृद्धेच्या खून प्रकरणी एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी आरोपी बाळू उर्फ मुकुंदा बाबूलाल लोहार (वय 30) याला अटक केली होती. त्याने गावातील अजून दोन वृद्ध महिलांचा खून केल्याचे समोर आले. या प्रकरणी दुसरी फिर्याद सुरेश चैत्राम सुरवाडे (रा.हरीविठ्ठल नगर, जळगाव) यांनी दिली. त्यात त्यांची आई द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (वय 70, रा.चांभारवाडा, किनगाव बुद्रुक) यांचा 28 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री ७ ते ८ वाजेदरम्यान खून झाला.
गावात वीजपुरवठा खंडित झाल्याचा गैरफायदा घेत बाळूने घरात घुसून रुमालाने द्वारकाबाईंचा गळा आवळून खून केला. त्यांच्या अंगावरील दागिने आणि घरातील पेन्शनचे पैसे चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
तिसरा खुनाचा गुन्हा शामकांत श्रीराम पाटील (रा.पारोळा रोड, धुळे) यांच्या फिर्यादीवरून दाखल झाला. त्यांची आजी रुख्माबाई कडू पाटील (रा.चौधरी वाडा, किनगाव बुद्रुक) या 19 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी घरात एकट्याच होत्या. बाळू ने घरात त्यांची हत्या केली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेले असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी बाळू लोहार याला झन्नामन्ना जुगार खेळण्याचा नाद आहे. हा शौक पूर्ण करण्यासाठी त्याने अंगावर चांदीचे दागीने असलेल्या व घरात एकट्या राहणार्या वृद्ध महिलांना लक्ष केले. तो जुगार खेळायला चोपडा, शिरपूरसह मध्य प्रदेशात जात असल्याचे समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.