⁠ 
सोमवार, मे 27, 2024

सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या भाच्याने उचललं टोकाचं पाऊल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । घरोघरी अक्षय्य तृतीयेचा आनंद साजरा होत असताना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या भाच्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना कुसुंबा येथे उघडकीस आली.स्वप्नील दीपक पाटील (१५, रा. बाळद, ता. भडगाव) असं गळफास घेतलेल्या मुलाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

भडगाव तालुक्यातील बाळद येथील स्वप्नील पाटील हा इयत्ता नववी वर्गातून उत्तीर्ण होऊन दहावीत गेला. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने तो जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामा किशोर भानुदास पाटील यांच्याकडे लहान भावासह आला होता. शुक्रवार, १० मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. दुपारी त्याची आजी त्याला जेवणासाठी बोलवायला गेली असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यावेळी आजीने इतरांना बोलवले व दरवाजा तोडला असता स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले

सणाचा आनंद बुडाला दुःखात
घरोघरी अक्षय्य तृतीयेचा आनंद साजरा होत असताना गोडधोड जेवणाची तयारी सुरू होती. त्यानुसार जेवणासाठीच आजी स्वप्नीलला बोलवायला गेली व दरवाजा उघडताच सर्वांना धक्का देणारी घटना समोर आली. त्यामुळे पाटील कुटुंबासह गावात सणाचा आनंद दुःखात बुडाला