जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । जळगाव शहरातील प्रभाग ५ म्हणजेच शहरातील सर्वात मोठा प्रभाग. दिग्गज नगरसेवकांचा प्रभाग असलेल्या या प्रभागातील एका गल्लीत माजी उपमहापौर आणि दोन माजी नगरसेवक राहत असून देखील तुटलेल्या गटारीचे काम होत नाही. जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत गेल्या आठवड्यात वृत्त प्रकाशित केले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून नगरसेवक नितीन लढ्ढा, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, मुकुंदा सोनवणे, माजी उपमहापौर अनिल वाणी यांनी कामाची पाहणी देखील केली आहे.
जळगाव शहर मनपा अंतर्गत विकासकामांसाठी गेल्या काही महिन्यात मोठा निधी उपलब्ध झाला आहे. काही कामांना सुरुवात झाली तर काही कामांना मंजुरी देखील मिळाली आहे. मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून काही प्रभागात विशेषतः प्रभाग ५ मध्ये गटारींची कामे सुरु आहेत. जळगाव शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणजे प्रभाग ५ आहे. शनिपेठपासून सुरु होऊन शाहूनगर व्हाया गांधीनगर जाणाऱ्या या प्रभागाचे नगरसेवक देखील दिग्गज आहेत. प्रभाग ५ चे नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे आणि ज्योती तायडे हे आहेत.
प्रभाग ५ मधील शनीमंदिरासमोरील गल्लीत माजी उपमहापौर अनिल वाणी, माजी नगरसेवक सुनील माळी, प्रशांत पाटील, प्रभाग समिती सदस्य जगदीश नेवे हे राहतात. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु असताना गटारीवरील ढापा तुटल्याने मोठा खड्डा पडला होता. त्वरित दुरुस्ती न केल्याने खड्डा वाढतच गेला असून जवळपास अर्धी गटार तुटून रहदारीसाठी रस्ता अर्धाच राहिला आहे. गटारीचे काम करण्यासाठी नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला तरी देखील अद्याप काम मार्गी लागलेले नाही. एका नगरसेवकाने हे काम घेतले असून काम संथगतीने सुरु असल्याचे जळगाव लाईव्ह न्यूजने वृत्त प्रकाशित केले होते.
जळगाव लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची दखल घेत गुरुवारी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक नितीन लढ्ढा, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, मुकुंदा सोनवणे, माजी उपमहापौर अनिल वाणी यांनी कामाची पाहणी देखील केली आहे. रेती उपलब्ध होत नसल्याने कामाला विलंब झाल्याची माहिती आहे. गटारीच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. काम लवकर पूर्ण झाल्यास अपघात देखील टळणार आहेत.