जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । केळी उत्पादकांवरील संकटांची मालिका थांबायला तयार नाही. वादळी वार्यासह झालेल्या पावसाने शेकडो हेक्टरवरील केळी आडवी झाली असतानाच शनिवार, 11 जून रोजी पुन्हा रावेरसह तालुक्यातील अनेक भागात वादळी पाऊस झाल्याने पुन्हा शेकडो हेक्टरवरील केळी पिकाला फटका बसला आहे. नुकसानीचा नेमका अंदाज आलेला नसलातरी तीन वेळा कोसळलेल्या संकटामुळे रावेर तालुक्यातील केळी उत्पादकांचे दिडशे कोटींहून अधिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकर्यानां आहे. दरम्यान, अनेक भागात घरांवरील पत्रे उडाली असून वृक्ष उन्मळल्याने रस्ते बंद झाले आहे तर वीज तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
रावेर तालुक्यात केळी पिकांच्या नुकसानीचा धडाका सुरूच आहे. 31 मे रोजी रोजी वादळी पावसामुळे सुमारे 25 कोटींचे तर 8 जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे 50 कोटींवर नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवार, 11 रोजी पुन्हा तिसर्यांदा अस्मानी संकटाने केळी उत्पादकांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वादळी पावसामुळे पातोंडी, बोहर्डे, पुनखेडा, भोर पट्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडे उन्मळुन पडल्याने पातोंडी-रावेर मार्ग बंद झाला आहे.
शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी पुन्हा भुईसपाट झाली. रावेर तालुक्यात मागील दहा दिवसात तिसर्यांदा केळी पिकाची मोठी हानी झाली आहे. वादळासह जोरदार पाऊसदेखील झालयाने काहीसा गारवा निर्माण झाला. घटनेची माहिती समजताच शेतकरी संदीप सावळे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे विनोद पाटील, नारायण धनगर, भगवान बोरसे, विलास बोरसे, जगन्नाथ बोरसे, समाधान पाचपोळे, लक्ष्मण सावळे, स्वप्नील सावळे, अशोक पाटील, हरीश पाटील, डॉ.गुलाब पाटील, हिंमतराव पाटील, विजय कौतीक पाटील, बिजलाल लवंगे, पंकज सपकाळे आदी केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
वादळी पावसामुळे रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गावर मोठी झाडे उन्मळुन पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. अनेक विजांच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला तर अनेक गावांमध्ये हायमास्ट लॅम्प तुटून पडले तसेच अनेक घरांवरील पत्रे उडाल्याचे वृत्त आहे. रावेर शहरातदेखील वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.