मोठी बातमी : जिल्ह्यातील ७ तालुक्यांचा पाणीप्रश्न ‘या’ प्रकल्पामुळे सुटणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । पाडळसरे अमळनेर तालुक्यासह सहा तालुक्यांसाठी आशेचा किरण असलेल्या पाडळसरे धरणाचे काम पावसाळ्यानंतरे गती घेणार आहे. गेल्या २४ वर्षात १४२ कोटींवरून ३,४४४ कोटींवर पोहोचली या प्रकल्पाची किंमत पाहता यंदा पावसाळ्यानंतर धरणाच्या कामाला गती येणार आहे. नदीपात्रातील मुख्य धरणाच्या प्रस्तंभ बांधकामाच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, संकल्प चित्राला अंतिम मंजुरी मिळाली आहे. तसेच शासनाने वाढीव २१ कोटी ५० लाखांच्या खर्चाला मान्यता दिल्याने, आता धरणाची उंची वाढवण्याचे काम पावसाळ्यानंतर गती घेणार आहे.
नाशिकच्या ‘मेरी’सं स्थेकडून पाडळसरे धरणाच्या गेटच्या डिझाइनमध्ये बदल झाल्याने, संकल्प चित्राच्या मान्यतेसाठी प्रतीक्षा होती. त्यामुळे प्रत्यक्ष नदीपात्रातील गेटचे काम सुरू होऊ शकत नव्हते. परिणामी धरणाची उंची वाढविण्यास अडचणी होत्या. त्यात आता धरणातील २४ प्रस्तंभ गेटच्या संकल्पचित्राला अंतिम मान्यता प्राप्त झाल्याने अमळनेर, चोपडा, धरणगाव, पारोळा व धुळे तालुक्यासाठी निम्न तापी प्रकल्प वरदान ठरणार आहे. १९९७ ला १४२ कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त पाडळसरे धरणाची, २४ वर्षात सध्याची किंमत ३,४४४ कोटींपर्यंत गेली आहे. मात्र अद्यापही केंद्रीय जलआयो गाकडे फक्त २७५१ कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर धरणाच्या कामांना गती मिळून, साठा वाढवला जाणार आहे.पाडळसरे धरणाचे ड्रोन छायाचित्र टिपले आहे गणेश पाटील यांनी
प्रस्तंभ उंची १ मीटर कमी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे बैठक लावून, संकल्पचित्राची अडचण मांडली होती. बैठकीत संकल्पचित्राची जबाबदारी आयआयटी पवईकडे सोपवण्यात आली होती. आयआयटीकडून संकल्प चित्र आल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर दर्जा वाढवण्याच्या खर्चाला मंजुरीसाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शासनाकडून २१ कोटी खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान नदीपात्रात प्रस्तंभ डिझाइन बदलल्याने आधीचे प्रस्तंभ एक मिटरपर्यंत कटिंग केले आहे.
अडचणी झाल्या दूर, पावसाळ्यानंतर काँक्रिटीकरणाला हाेणार प्रारंभ शासनाने संकल्प चित्र व बदलानुसार वाढीव खर्चास मंजुरी दिल्याने आता प्रत्यक्ष गेटच्या कामाला सुरुवात करण्यास कोणतीच अडचण राहणार नाही. नव्या डिझाइननुसार दर्जा वाढवण्यासाठी उच्चप्रतीचे स्टील आणि सिमेंट वापरण्यात येईल. पावसाळ्यानंतर काँक्रीटीकरणास सुरुवात होईल. -मुकुंदा चौधरी, कार्यकारी अभियंता, पाडळसरे धरण कटिंगचा खर्च पाच कोटी प्रस्तंभ कटिंगसाठी सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचा खर्च आला आहे. २३ पैकी २१ प्रस्तंभ १३९ मीटरपर्यंत बांधले होते. पावसाळ्यापूर्वी कटिंगचे काम आटोपण्यात आले आहे.