जळगाव लाईव्ह न्यूज । सायसिंग पाडवी । आजच्या काळात कमी वयात गुंडगिरीच्या बळावर स्वतःचे नाव गाजविणारे अनेक आहेत पण एक काळ असा होता जेव्हा इंग्रज भारतावर विशेषतः आदिवासी समुदायावर अन्याय करीत होते. मिशनरी शाळांच्या नावाखाली सुरु असलेले धर्मांतर त्याने कमी वयातच ओळखले आणि तेव्हाच सुरु झाली त्याच्या संघर्ष लढ्याची कहाणी. आदिवासी विशेषतः मुंडा समाजाच्या उद्धारासाठी काम करताना नागरिकांना एक आशेचा किरण दिसू लागला. हळूहळू जनतेने त्याला दैवत मानले. आपल्याला न्याय हाच मिळवून देऊ शकतो, आपल्या जमिनी हाच क्रांतिकारक परत मिळवून देणार म्हणत जनतेने त्या तरुणाला ‘धरती आबा’ची उपमा दिली. इंग्रजांच्या तावडीत सापडल्यावर विषप्रयोगानंतर काळाच्या ओघात दि.९ जून १९०० रोजी सर्वांना सोडून गेलेला हा आद्य क्रांतिकारी म्हणजे भगवान बिरसा मुंडा. ‘उलगुलान’ आंदोलन आणि बिरसायत पंथाची स्थापना करून त्यांनी एक वेगळाच इतिहास रचला होता. तो आजही कायम असून आदिवासी समाजात त्यांना दैवत म्हणून पुजले जाते.
१८५७ च्या उठावानंतर देशातील वातावरण प्रचंड चिघळले होते. इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढत होता. इंग्रज आदिवासी समाजावर अत्याचार करीत होते. अशातच बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. जर्मन मिशनरी शाळेत शिकण्यासाठी धर्मांतर आवश्यक असल्याने ते केल्यावर बिरसा मुंडा यांना शाळेत प्रवेश मिळाला. काही महिन्यातच आपल्यासारख्या अनेकांना प्रशिक्षणाच्या नावाखाली अडकविण्यात आल्याचा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि ते शाळेतून बाहेर पडले. बिरसांना आपले वडिल सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते.
बिरसा म्हणजेच सक्षम. इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी बिरसा स्वतः सक्षम होते पण त्यांच्या टोळीतील फारसे लोक सक्षम नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्येक प्रकारे सक्षम करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आणि लढ्याच्या निमित्ताने फक्त भालाच नाही तर हाती शस्त्रंही घेतली. आजवर शांततेच्या आणि सरदारी पद्धतीच्या लढाईचा फारसा परिणाम होत नसल्याचे बिरसा मुंडा यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी ‘उलगुलान’ सुरु केले. अन्यायाविरुद्ध सशस्त्र क्रांती सुरु झाली. ‘सिरमारे फिरून राजा जय’, म्हणजे ‘पूर्वज राजाचा विजय’ असा नारा देण्यात आला. बिरसांची ही हाक त्यांच्यासारख्या अनेकांना आवडली आणि सर्वत्र एक उत्साह संचारला. आंदोलकांचे जत्थेच्या जत्थे बिरसांना जुळले. हळूहळू बिरसाची एक फौज उभी राहिली.
हे देखील वाचा : आगळावेगळी विवाह परंपरा : ‘वर’ पक्ष हुंड्यात देतो ९ ग्लास दारू, धान्य, रोख ५१ हजार ४९ रुपये
१८९४ मध्ये देशातील अनेक भागात भीषण दुष्काळ पडला होता. परिणामी उपासमार आणि साथीचे रोग पसरले. हजारो लोक मृत्यूच्या दाढेत अडकले. सरकार मदतीसाठी सक्षम नसले तरी बिरसा आणि त्याच्या साथीदारांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. आपल्या प्रत्येकाच्या मदतीला बिरसा धावून गेले. कानाकोपऱ्यात, डोंगर, दऱ्यांमध्ये त्यांनी शक्य ती मदत पोहचवली.बिरसा आणि त्याचे साथीदार त्यांच्या लोकांसाठी ‘देव’ बनले. ज्यांनी सर्व प्रकारे संकटांशी झुंजणाऱ्या लोकांना मदत केली. त्यामुळे बिरसावर प्रेम करणारे अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित झाले. नागरिक आता बिरसा यांना नमस्कार म्हणजेच जोहर करीत नव्हते तर ते ज्या ठिकाणी ते बसायचे, ध्यान करायचे, नमन करायचे अशा ठिकाणी नागरिकांनी चुंबन घेत नमन करण्यास देखील सुरुवात केली. बिरसांनी आता ‘बिरसायत’ हा वेगळा पंथ सुरू केला होता. तो पंथ स्वीकारणाऱ्यांची संख्याही वाढत होती.बिरसा दैवताच्या ठिकाणी असल्याने नागरिकांची त्यांना देवाची उपमा दिली. आदिवासींचा ‘भगवान बिरसा’वरील विश्वास वाढतच गेला. बिरसा हेच आपल्याला पिण्याचे पाणी, जंगल आणि जमीन परत मिळवून देतील असा विश्वास नागरिकांना होता म्हणूनच त्यांनी बिरसा मुंडा यांना ‘धरती आबा’ (पृथ्वीचा पिता) अशी उपाधी दिली.
भीषण दुष्काळ आटोपला आणि बिरसाची फौज कामाला लागली. बाणांनी सज्ज असलेल्या बिरसाच्या फौजेने ब्रिटिशांच्या बंदुका शांत केल्या. असे म्हटले जाते की बिरसा आणि त्याचे इंग्रजांसोबतचे सहकारी यांच्यातील सशस्त्र संघर्षाची प्रक्रिया सुमारे तीन-चार वर्षे चालली. यात अनेकदा बिरसाचे सैन्य जड होते, यामुळे अस्वस्थ होऊन इंग्रजांनी बिरसा यांना पकडण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले. बिरसा काही केल्या इंग्रजांच्या हाती लागत नव्हते. तोडा, फोडा, राज्य करा ही पद्धत अवलंबत इंग्रजांनी डावपेच आखले. काही फितुरांना हाताशी धरत बिरसा यांचा शोध घेण्यात येऊ लागला. असे म्हणतात कि, फेब्रुवारी १९०० मध्ये जेव्हा बिरसा यांना पकडले पकडले तेव्हा ते एका अरुंद गावात होते किंवा चक्रधरपूरच्या जामकोपई जंगलात कुठेतरी होते आणि ते पकडले गेले. पोलिसांनी त्यांना रांचीला आणले. तेथे त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. रांचीच्या याच तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना इंग्रजांनी त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचे बोलले जाते. त्यांची प्रकृती बिघडल्यावर १ जून १९०० रोजी तेथील उपायुक्तांनी बिरसा यांना कॉलरा झाल्याचे जाहीर केले. ९ जून १९०० रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
समाजासाठी केलेल्या संघर्ष, त्याग, मेहनतीमुळे जनतेने बिरसा यांना भगवान म्हटले. आजही त्यांना पुजले जाते. आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे नाव, त्यांच्या नावाच्या खुणा, त्यांचे कार्य, त्यांच्या ‘बिरसियत’ची शिकवण आजही पृथ्वीवर कायम आहे. बिरसा मुंडा यांच्याप्रमाणेच आदिवासी समाजात जननायक तंट्या भिल्ल, जननायक जयप्रकाश नारायण, जननायक राघोजी भांगरे, जननायक एकलव्य, राणी दुर्गावती असे अनेक क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी समाजासाठी दिलेल्या बलिदानाच्या बळावरच आजचा समाज उभा असून प्रगती करीत आहे.