⁠ 
सोमवार, मे 6, 2024

इतिहासाच्या पानात हरवलेला योद्धा स्वातंत्र्य सेनानी ‘वीर बहादूर खाज्या नाईक’

जळगाव लाईव्ह न्यूज । सायसिंग पाडवी । भारतीय स्वातंत्र्यलढ्यात थोरपुरुषांच्या सोबतच आदिवासी क्रांतिवीर नेहमीच अग्रेसर होते. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु आदिवासी लढ्याचा, क्रांतिवीरांचा इतिहास आजवर कधीच समोर आला नाही ही भारतीय इतिहासाची मोठी शोकांतिकाच आहे. खान्देश प्रांत आणि सातपुड्याने अनेक थोर आदिवासी सेनानी देशाला दिले. त्यातील एक नाव म्हणजे वीर बहादूर “खाज्या नाईक” इतिहासाच्या पानात हरवलेला आणि कायम उपेक्षित राहिलेल्या या योध्याच्या यशोगाथा कधी ऐकायला मिळाल्या तरी अंगावर शहारे येतात. इंग्रजांच्या नाकावर टिच्चून केलेली लूट आणि १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात केलेले नेतृत्व खाज्या नाईक यांना अजरामर करून गेले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या सत्तेविरोधात आवाज उठविण्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी समाजातील सिद्धू कान्हा, राणी गायडीनल्लू, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती मडावी, राणा पुंजा भिल, खाज्या नाईक, झलकारी बाई, तंट्या मामा, राघोजी भांगरे, भीमा नाईक, नंदुरबार जिल्ह्यातील किरसिंग भील, रुमाल्या नाईक असे अगणित नावे समोर येतात. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या “चले जाव” चळवळीत नंदुरबारच्या शिरीष कुमार मेहता या बाल क्रांतीवीरास इंग्रजांनी गोळ्या मारून ठार केले हा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे परंतु शिरीषकुमार सोबत किरसिंग भील यांना देखील इंग्रजांनी गोळी लागून ठार केले हा इतिहास कधीच समोर आला नाही. संपूर्ण इतिहास आजवर समोरच न आल्याने किरसिंग भीलप्रमाणे अनेक योद्धे दुर्लक्षित राहिले.

सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिवीर देखिल मागे नव्हते. आदिवासींचे नेतृत्व करण्यात एक नाव पुढे होते ते म्हणजे “खाज्या नाईक” एक धुरंदर नेतृत्व सातपुडा परिसरामध्ये इंग्रजांविरुद्ध लाखो आदिवासी स्त्री, पुरुष, तरुणांना घेऊन इंग्रजांशी दगड, कुऱ्हाडे, गोफण, बाला घेऊन लढत होते. खाज्या नाईक हे इंग्रजांच्या पोलीस खात्यात नोकरी करत होते. जिल्हाधिकारी मेन्सफिल्ड याने सेंधवा ते शिरपूर या ४० मैलच्या रस्त्यावर त्यांची नेमणूक केली होती. खाज्या नाईक यांनी प्रामाणिकपणे वीस वर्षे काम केले परंतु एक दिवशी गुन्ह्याचा तपास करण्याच्या कामात त्यांच्या हातून कबुली जवाब घेताना एक गुन्हेगार मारला गेला त्यामुळे इंग्रजांनी त्यांना दहा वर्षाची शिक्षा दिली. जेलमध्ये खाज्या नाईक यांची वागणूक चांगली असल्यामुळे पाच वर्षाची शिक्षा माफ करण्यात आली आणि १८५५ साली त्यांना पुन्हा सोडण्यात आले.

१८५० च्या काळात भारतभर अनेक इंग्रज व सहकार सेठ आदिवासींना छळत होते, लुटत होते, जल जंगल, जमीनवर अतिक्रमण करत आदिवासींना हीन वागणूक देत होते. आपल्या सभोवताली घडणाऱ्या सर्व गोष्टींचा खाज्या नाईकवर परिणाम जाणवत होता. कारण त्या काळी उत्तर भारतात बंडाच्या घटना घडू लागल्या होत्या. १८५७ मध्ये खाज्या नाईक यांची सेंधवा ते शिरपूर घाटात पुन्हा नेमणूक करण्यात आली पण त्यांना नोकरीत रस राहिला नव्हता. स्वातंत्र्याचा आणि आदिवासी, पारंपरिक जीवनावर होणारे विविध घटना डोळ्यासमोर येत असल्याने नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.

भीमा नाईक, कालू बाबा, बालू रावत असे अनेक साथीदार त्यांना मिळाले. भीमा नाईक आणि खाज्या नाईक यांनी शिरपूरला संयुक्तपणे २९ ऑक्टोबर १८५७ रोजी हल्ला केला त्यात १५०० आदिवासींनी सहभाग घेतला होता. इंग्रज कॅप्टन याने त्यांचा ५६ किलोमीटर पाठलाग गेला परंतु कुणीही त्याच्या हाती लागले नाही. पुन्हा १७ नोव्हेंबर १८५७ ला खाज्या नाईक, भीमा नाईक यांनी इंग्रज सरकारच्या जिल्हाधिकाऱ्याच्या नाका जवळून लूट करून कमालच केली तेव्हापासून पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना चांगलीच जबर बसली.

त्यांनतर खाज्या नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध स्त्री-पुरुष तरुण असे करीत तब्बल १५०० आदिवासींची मोठी तुकडी तयार केली होती. खाज्या नाईकांच्या नेतृत्वाखाली हि तुकडी इंग्रजांच्या विरोधात लढत होती. त्यावेळच्या खान्देश हद्दीपासून तीस मैलावर उत्तरेस होळकरांच्या हद्दीत “जामली चौकी”जवळ इंदोरहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर सात लाखांचा खजिना बैलगाडीतून जात होता तो त्यांनी लुटला आणि ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आव्हान दिले. अहमदनगर जिल्ह्यातील भागोजी नाईक व त्यातील काही सैनिक खाज्या नाईक यांच्यासोबत मिळाले आणि मग मनात लागलेली आग आणखीच ज्वलंत झाली. खाज्या नाईक आणि इतर सर्व नंतर शांत बसले नाही. सेंधवा घाटातील टेलिफोनच्या तारा तोडल्या, पोस्ट ऑफिस लुटले, भरलेल्या सात बैलगाड्या लुटल्या अशा रितीने त्यांची इंग्रजांसोबत लढाई सुरूच होती.

आसपासच्या राज्यातील रोहिले, पठाण, मकरानी, पेंढारी सैनिकांनी यांनी देखील खाज्या नाईक यांना लढ्यात साथ दिली होती. त्या काळात खाज्या नाईक यांचे घर सेंधवा येथे होते आणि ते तिथून आपल्या घरी ये-जा करीत होते. परंतु ब्रिटिश सरकार त्यांना अटक करू शकत नव्हते यावरून इंग्रजांना खाज्या नाईक यांचा केवढा मोठा दरारा त्या परिसरात होता हे दिसून येते. ११ एप्रिल १८५७ इंग्रजांविरुद्ध मोठी लढाई सुरू होती. लढाईतील हा अंबापाणी संग्राम इतिहासात अजरामर आहे. खाज्या नाईक, दौलतसिंग नाईक, नाईक भीमा नाईक यासारखे क्रांतिकारी साथीदार एकत्रित झाले होते.

डोंगराच्या शिखरावर सगळे जमले आणि मोठ्या खडकाचा आश्रय घेऊन लढत होते. लढाई सकाळी ८ वाजेपासून सुरू होऊन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहत होती. बंडखोर आदिवासींच्या स्त्रियादेखील या लढाईमध्ये मागे नव्हत्या. स्त्रिया अत्यंत महत्त्वाचे काम करत होत्या, ते म्हणजे गुप्त माहिती देणे, लढण्याचे साहित्य पुरवणे, भाकरी देणे व स्वतः पुढे होवून धनुष्यबान तीर कमान चालवणे तसेच शत्रूच्या हालाखीच्या निरोप गुप्तपणे पोहोचवणे, वेळप्रसंगी लढाईत भाग घेणे त्यामुळे इंग्रजांना त्या त्रासदायक वाटत होत्या.

या लढ्यात अनेक आदिवासी शहीद झाले. काहींना जिवंत पकडून त्यांना लष्करी ढोल वाजवून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या लढाईत खाज्या नाईक यांचा मुलगा दौलतसिंग मारला गेला. अनेक बंडखोर जखमी झाले. लढाईत तब्बल ४६० क्रांतिवीर शहीद झाले होते त्यात खाज्या नाईक यांची बायको भीमा नाईक यांचे पुतणे व अनेक स्त्रिया देखील होत्या.

पुन्हा कोणी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवू नये आणि परिसरात दहशत बसवण्यासाठी अनेक चकमकीनंतर खाज्या नाईक इंग्रजांच्या हाती लागल. इंग्रजांनी खाज्या नाईक यांचे डोके कापून लिंबाच्या झाडाला आठ दिवस टांगून ठेवले होते. अशा या भारतीय इतिहासातील थोर क्रांतीविराची शहीद दिवस तारीख निश्चित नाही पण ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणी स्वातंत्र्य संग्रामात ४६० आदिवासी क्रांतिवीर शहीद झाले या दिवसाला सातपुडा परिसरात ‘क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस’ म्हणून साजरी करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत इतरांना प्रेरणा देतात.

पहा खास व्हिडीओ :