⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

चाळीसगाव पोलिसांचा गावठी दारूच्या भट्टीवर छापा; एक लाख रुपयांच्या दारूसह कच्चे रसायन साहित्य जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । चाळीसगाव शहर पोलिसांनी विविध चार गावांमध्ये अवैध गावठी दारुच्या हातभट्ट्यांवर छापा टाकून तब्बल ६ गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. तेथून एक लाख रुपयांची गावठी दारू, कच्चे रसायन व इतर साहित्य जप्त करून नष्ट केल्याची माहिती पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांनी दिली. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली.

शहर पोलिस ठाणे हद्दीतील टाकळी प्र.चा., ओ झर, पातोंडा व वाघडू या परिसरात अवैधरीत्या गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सकाळी सहा ते सातच्या दरम्यान पोलिस निरीक्षक के.के. पाटील, सपाेनि सागर ढिकले, पोउनि आव्हाड, एएसआय अनिल अहिरे यांच्या नेतृत्वात पथकांनी या हात भट्ट्यांवर छापे घातले. या ठिकाणी एकूण ६ गावठी दारू गाळण्याच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्या ठिकाणांहून १ लाख १ हजार ८०० रुपयांची ३ हजार ९६५ लिटर गावठी दारू जप्त करून ती नष्ट केली. तसेच कच्चे रसायन व इतर साहित्यही जागेवरच नष्ट करण्यात आले. या कारवाईमध्ये गंगुबाई आनंदा माळी व धनराज भिका गायकवाड दाेघे रा. ओझर, ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड, जितेंद्र पांडुरंग गायकवाड, राधेश्याम गुलाब गायकवाड, तिघे रा. पातोंडा, जंगलू बन्सी भिल्ल, रा.वाघडू यांच्यावर मुंबई प्रोव्हिजन अॅक्टप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.