किराणा दुकानदार आहेत ? सावधान तुम्हला भरावा लागेल १०० रुपये दंड
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । जर तुम्ही किराणा व्यावसायिक (अन्न व्यवसाय करणारे) असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला दररोज १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तसा इशारा दिला आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्न व्यवसाय करणाऱ्या उत्पादक आस्थापनांनी सन 2021-2022 या महसुल वर्षापासुन वार्षिक परतावा फॉर्म डी -1 ऑनलाईन भरावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी केले आहे.
फॉर्म डी-1 भरण्यासाठी आपला युझर आय डी व पासवर्ड वापरुन https://foscos.fssai.gov.in या सकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. या सुविधेमुळे या वर्षापासून ग्राहकांना डी-1 फॉर्म भरण्यासाठी कार्यालयात ईमेल करणे अथवा कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज राहणार नाही. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांना युझर आयडी व पासवर्ड माहित नसल्यास त्यांनी संकेतस्थळावर भेट देवून फॉरगेट पासवर्ड व लॉगीन आयडी करुन नविन लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करावा.
अन्न व्यवसायीकांना डी-1 फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 30 जून 2022 असुन या तारखेनंतर अर्ज करणाऱ्यांना प्रती दिवस 100 रुपये दंड भरावा लागेल याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. वार्षिक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. 1800112100 अथवा [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.