जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । शहरात अल्पवयीन आणि तरुणाईची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास मू.जे.महाविद्यालयाजवळ असलेल्या एका कॅफेत तीन तरुण जबरदस्ती शिरले. कॅफेच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या फॅमिली कॅबिनला जाऊन त्याठिकाणी बसलेल्या सर्वांना त्यांनी जबरदस्ती हाकलले आणि वेगवेगळ्या पोज देत फोटो शूट करू लागले. इतकंच काय तर त्या तिघांनी कॅफेचालकाला न जुमानता धमक्या देत तिथेच बसून मद्यपान देखील केले. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
मू.जे.महाविद्यालयाच्या पुढील चौकात एक कॅफे आहे. कॅफेत पहिल्या माळ्यावर तरुण तरुणी, फॅमिलीसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पहिल्या माळ्यावर मित्र मैत्रिणी बसलेले असताना तीन युवक अचानक वर शिरले. इतरांना जबरदस्तीने दादागिरी करीत त्यांनी बाहेर पाठविले.
कॅफेच्या पहिल्या माळ्यावरून इतरांना खाली पाठविल्यानंतर तिघांनी वरील माळ्याचे सर्व लाईट्स सुरु करून मोबाईलमध्ये फोटो शूट केला. काही वेळाने कॅफेतील कर्मचाऱ्यांनी प्रकार खाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पहिला असता एक कर्मचारी त्यांना जाब विचारण्यासाठी गेला. तिघांनी कर्मचाऱ्यालाच धमकावीत आम्ही इथेच बसून मद्यपान करू आणि तसे नाही करू दिले तर मॅटर होईल, अशी धमकीच भरली. तिघांनी त्याच ठिकाणी बसून जबरदस्ती मद्यपान केले. पुन्हा खाली येऊन तिघांनी वाद घातला आणि निघून गेले. सुमारे तासभर हा प्रकार सुरु होता.
कॅफेतील घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी सर्व प्रकार आपल्या मालकांना कळविला आणि सीसीटीव्ही फुटेज देखील हस्तगत केले. दरम्यान, कॅफेत शिरलेल्या तरुणांकडे काहीतरी शस्त्र देखील होते अशी माहिती कॅफेतील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी कॅफेतील कर्मचाऱ्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून रामानंद नगर पोलिसांसह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
जळगाव शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी दादागिरीचे प्रकार होऊ लागले तर सर्वसामान्य नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण, तरुणी यांनी गप्पा करण्यासाठी बसायचे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.