जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । देशभरातील शेतकरी आणि सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहे. यंदाचा कडक उन्हाळा अद्यापही त्रासदायक ठरत असल्याने पाऊस केव्हा येणार याची प्रतीक्षा लागून आहे. मान्सूनपूर्व सरींचे अंदमान येथे आगमन झाले असून लवकरच राज्यात देखील आगमन होणार आहे. राज्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक गुरुवारी पार पडली. बैठकीत भारतीय हवामान विभागाचे के.एस.होसाळकर यांनी माहिती दिली असून राज्यात यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
पावसाची सर्वांना प्रतिक्षा लागून असून मान्सूनचे वेध लागले आहे. पावसाळ्यापूर्वी बैठकांना वेग आला असून राज्यशासन देखील कामाला लागले आहे. गुरुवारी झालेल्या खरीप हंगामपूर्व बैठकीत भारतीय हवामान विभागाचे के.एस.होसाळकर यांनी मान्सून संदर्भात काही अंदाज व्यक्त केले. होसाळकर यांच्या अंदाजानुसार यंदा मराठवाड्यात सामान्यांपेक्षा जास्त पाऊस होईल तर महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अंदमानमध्ये १६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. भारताच्या दिशेने सरकत असलेला मान्सून केरळमध्ये २७ मे रोजी पोहचणार असून नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रात ५ जूनला तळ कोकणात मान्सून दाखल होईल. मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल तसेच एकूणच महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदा देखील ला नीना परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.