जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जळगाव जिल्ह्य़ात वढोदा वन परिक्षेत्राचा कारोभार रामभरोसे चालत असून गेल्या नऊ महिन्यांपासून या संवेदनशील जंगलावर ‘प्रभारी राज’ असून अधिकारी केव्हा मिळणार अशी आर्त हाक वन्यप्रेमींकडुन केली जात आहे. यामुळे इतर प्राण्यांसह वाघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात वढोदा वनविभागाचा १५ हजार हेक्टर विस्तीर्ण आणि व्यापक परिसर असून अंतुर्ली ता.मुक्ताईनगर ते वढोदा मच्छिंद्रनाथ तर मेळसांगवे, खामखेडा ते पिंप्राळा धुपेश्वर नदी पर्यंत तसेच उत्तरेस मध्यप्रदेश सीमेपर्यत हा परिसर विस्तारला असून विविध वनसंपदेसह वन्यप्राण्यांच्या सहवासाने नटलेला आहे. या वनक्षेत्रामुळे तालुक्याला हिरव्याकंच सातपुड्याचं कोंदण लाभले असून पट्टेदार वाघ, बिबटे, अस्वल, तरस, कोल्हे, लांडगे आदी हिंस्त्र श्वापदासह तृणभक्षी प्राणी विविध जातींचे हरिण, मोर, लांडोर, खवले मांजर, उद मांजर, आदी सह विविध जातींचे पक्षी आहेत तर थेरोळा शेतीशिवारात पुर्णा काठाने शेतकऱ्यांना रानगवा आढळून आला तर तीन वर्षापूर्वी डोलारखेडा जंगलात पट्टेदार वाघाने रानगव्यावर झडप घालून शिकार केली असून जवळपास चार रानगवे असल्याचे समजते तर एवढ्या वैभवाने समृद्ध असलेल्या जंगलात तत्कालीन वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांची ऑगस्ट २०२१ मध्ये बदली झाली असून तब्बल नऊ महिन्यांपासून या संवेदनशील जंगलावर प्रभारी कारोभार सुरू आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे.
२०१४ पासून मुक्ताई- भवानी व्याघ्र राखीव संवर्धन क्षेत्राची घोषणा
जळगाव जिल्ह्य़ात फक्त वढोदा वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघ आणि बिबटे यांची संख्या लक्षणीय बाब असून यामुळेच महाराष्ट्रासह देशात जळगाव जिल्ह्य़ाचे एक नाव आहे वढोदा वनपरिक्षेत्रातील डोलारखेडा नियत क्षेत्रात तब्बल आठ वाघांची संख्या असल्याचे समजते डोलारखेडा जंगलात वाघीण प्रजनन करून बछड्यांना प्रशिक्षण देत असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच २०१४ मध्ये वनविभागाचे तत्कालीन मुख्य सचिव प्रविण कुमार परदेशी यांनी चारठणा येथील भवानी मातेच्या मंदिरावर घोषणा केली तेव्हापासून आजतागायत फक्त बैठकच सुरू आहेत अजून काम मार्गी लागले नाही.
वाघांचा कायम अधिवास असलेल्या संवेदनशील भागातील डोलारखेडा, नांदवेल व वायला या तिन गावांच्या पुनर्वसन करण्याबाबतची प्रक्रीया शासन दरबारी सुरु असल्याचे समजते. तसेच काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली म़ंत्रालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार यांच्या उपस्थितीत याक्षेत्रातील विकासाबाबत बैठक पार पडली. यामुळे या व्याघ्र अधिवासक्षेत्राच्या पर्यटन विकासाची आशा जिल्हावासिय बाळगून होते मात्र अद्यापही याबाबत प्रतिक्षा कायम आहे.
संवेदनशील वढोदा वनक्षेत्राला कायमस्वरूपी वनाधिकारी केव्हा?
वढोदा वनक्षेत्राला गेल्या नऊ महिन्यांपासून कायम वनक्षेत्रपाल नसल्याने प्रभारी कारोभार सुरू आहे. शेती-शिवारात असलेला वाघांचा मुक्त संचार बघता शिकाऱ्यांची टोळी या भागात सक्रीय होऊ शकते. त्यामुळे वाघाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही वढोदा वनपरिक्षेत्राच्या कार्यालयात कायम अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांसह इतर नागरिक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी यासंदर्भात अधिक लक्ष घालून या वनपरिक्षेत्राला कायम स्वरूपी अधिकारी द्यावा अशी मागणी वन्यप्रेमींकडुन केली जात आहे.
हे देखील वाचा :
- ठरलं तर ! EPFO खातेधारक ‘या’ महिन्यापासून ATM मधून पैसे काढू शकणार?
- अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी आवश्यक: केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय
- भुसावळच्या व्यापाऱ्याचा विश्वासघात! धनादेशचा गैरवापर दोघांनी केली २५ लाखांची फसवणूक
- युजवेंद्र चहल आणि धनश्रीचा घटस्फोट? दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं..
- Jalgaon : 32 वर्षानंतर आता ‘हा’ अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला; वाचा काय आहेत?