जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेच्या निकालाचा राज्यातील लाखो विध्यार्थी वाट पाहत आहे. या परीक्षेचा निकाल पुढील महिन्यात म्हणजेच जून महिण्याच्या पहिल्याच्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी दहावी (SSC Result) आणि बारावी (HSC Result) परीक्षेचा निकाल विध्यार्थी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यातील बोर्डाच्या परीक्षा मार्च ते एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत झाल्या. तर त्याच वेळी ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत बारावीच्या परीक्षा झाल्या.
दरम्यान, परीक्षा पार पाडल्यानंतर आता विद्यार्थांसह त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अशातच दहावीचा निकाल १० जून २०२२ रोजी आणि बारावीचा निकाल २० जून २०२२ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. आता बार कोड स्कॅनिंग सुरू आहे. त्यामुळे वरील तारखेपूर्वीच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्यापपर्यंत महाराष्ट्र मंडळाने निकालाबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
परीक्षेचा तपशील
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनी परीक्षा दिली. एकूण २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. संपूर्ण राज्यातील ५०५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा घेण्यात आली.