⁠ 
रविवार, मे 19, 2024

प्रशासन नाही…तर बळीराजा करतोय नांद्रा गावाला स्वखर्चाने पाणीपुरवठा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । पाणीपुरवठा ही सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी असताना काही राजकारणी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी मोफत पाणी देण्याचा आग्रह धरतात. परंतू सामाजिक कार्य व्हावे, या उद्देशाने पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील एक शेतकरी गेल्या 8 वर्षांपासून स्वखर्चाने गावाला पाणीपुरवठा करत आहेत.

दिड किलोमीटर अंतरावरून पाणी

तालुक्यातील नांद्रा येथील आदर्श शेतकरी माधवराव हिरामण सुर्यवंशी यांनी वरसाडे येथुन गिरणा नदीवरुन हडसन नांद्रा रस्त्यावरील शेतीसाठी पाईप लाईनने पाणी आणले आहे. २०१४ पासून म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून हा पाणीपुरवठा आणण्यात आलेला आहे. तेव्हा पासून गावातील लोकांना पाण्याची व्यवस्था व्हावी, या हेतूने त्यांनी मुख्य पाईप लाईनपासून दिड किलोमीटर अंतरावरून दोन इंची पाईप लाईनने गावात तीन ठिकाणी पाण्याचे तीन नळ कनेक्शन स्वखर्चाने करून दिलेले आहेत. त्यात एक कनेक्शन खालच्या गल्लीत संजय सुर्यवंशी यांच्या घराजवळ दुसरे कनेक्शन बोरसे गल्लीत तर तिसरे कनेक्शन हे उंबर चौक या गल्लीसाठी काढून दिलेले आहेत. गिरणा नदी आटल्याने गावातील पाणीपुरवठा विलंबाने होत असल्याने गावातील महिला वर्गाला या नळाने पाणी उपलब्ध होत असल्याने पाणीटंचाईची दाहकता काही सी कमी झालेली आहे. या दातृत्वाचे आदर्श शेतकरी माधवराव सुर्यवंशी यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान माधवराव सुर्यवंशी म्हणाले, गावातील लोकांना आपल्या माध्यमातून काही तरी सामाजिक कार्य व्हावे, या उद्देशाने मी २०१४ पासुन स्वखर्चाने दोन इंचीचे तीन कनेक्शन काढून दिलेले आहेत. त्यांचा ग्रामस्थांना फायदा होत आहे. याचे मला समाधान आहे.