जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । विरोधकांकडून होत असलेल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीवरून राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
राज्यात सत्ता नसल्यामुळे भाजपचे (bjp) नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून राज्यात वारंवार अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्या अशा बोंबा ठोकायच्या आणि राज्यपालांना भेटायचे हेच काम विरोधकांना उरलं आहे. विरोधक राज्यपालांना वारंवार भेटून एक षड्यंत्र सुरू आहे. पण राष्ट्रपती राजवट लावण्याचं हे षड्यंत्र यशस्वी होणार नाही, असा खळबळजनक दावा खडसे यांनी केला आहे. तसेच भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या युतीच्या दाव्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली.
2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युती होणार होती. त्यास शिवसेनेने विरोध केला होता असा शेलार यांनी गौप्यस्फोट केला आहे. यावर खडसे यांनी अंदर की बात सांगितली. 2014 मध्ये भाजप शिवसेना वेगळी लढली. मात्र 2019 मध्ये मात्र भाजप-शिवसेना एकत्रित लढली होती. जर 2017 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीला शिवसेनेकडून विरोध होता तर मग 2019 मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणूक का लढले? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
मूळात अशिष शेलार सांगताहेत ते अर्धसत्य असून 2019 मध्ये झालेल्या भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणुकीत अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवे होते. मात्र त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. त्याच वेळी जर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हे ठरलं असतं तर मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे युती तुटली नसती, असं खडसे म्हणाले.