जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । चाळीसगाव तालुक्याील ओढरे येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने, महिलांना जीवन जगणे कठीण झाले आहे. ग्रामासभेत दारूबंदीसह जुगार व सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबाबतचा ठराव मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सोमवारी सुमारे ५० ते ६० महिलांनी येथील ग्रामीण पोलिसांत धडक देत, गावातील अवैध दारू विक्री व जुगार बंद करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
अधिक माहिती अशी की, ओढरे गावात काही गुंड प्रवृत्तीचे लोक अवैध धंदे चालवत आहेत. गावात दारूबंदी करण्यासह अवैध धंदे बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. मात्र, संबंधितांकडून अर्जदार महिलांना शिवीगाळ केली जाते. गुंडांच्या या प्रकारामुळे महिलांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे गावातील अवैध धंदे बंद करावेत व आमचा संसार वाचवावा अशी मागणी या महिलांनी केली आहे. ओढरे ग्रामपंचायतीची एक वर्षापुर्वी २९ नाेव्हेंबर २०२१ ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यात गावात दारूबंदी करण्याबाबत गावातील महिला एकजूट झाल्या. त्यामुळे गावातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत असा ठराव महिलावर्गाकडून एकजुटीने मांडण्यात येवून तो मंजुर करण्यात आला. यावेळी सरपंचासंह ग्रामसेवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावात दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत मंजूर करून तशी नोंद प्रोसिडिंग बुकात घेण्यात आली. मात्र त्यानंतरही याबाबत काहीच निर्णय न झाल्याने व अवैध धंदे चालवणाऱ्या गुंडांकडून महिलांना धमक्या मिळत अाहेत. या महिलांनी सोमवारी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धडक देत ओढरे गावातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. अवैध दारुविक्रीमुळे तरुण व्यसनाधीन होत आहेत. तसे अनेक संसार उघड्यावर आले असून, बालकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने दारु बंदी करावी अशी मागणी आहे.