जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । आयुष्यात अश्या काही घटना घडतात ज्यामुळे मनाला प्रचंड दुःख सहन करावे लागते. परंतु, आयुष्यभर त्याच दुखत राहणं देखील कठीण असते. त्यामुळे त्या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा आयुष्य फुलावे यासाठी नवीन प्रयत्न करणे हेच योग्य, लग्नाच्या केवळ ४७ दिवसानंतर अभियंता असलेल्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. या संकटसमयी देखील सासू-सासऱ्यांनी आई-वडिलांसारखे प्रेम दिले. पोटच्या मुलीसारखे जपले. यामुळे वैधव्य आलेल्या तरुणीने माहेरी न जाता सासरी थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुनेसमोर तिचे संपूर्ण आयुष्य असल्याने सासू-सासऱ्यांनी तिची समजूत काढून रावेर तालुक्यातील रोझोदा येथील भूषण धांडे यांच्यासोबत विवाह लावून दिला. हा हृदयद्रावक प्रसंग रविवारी रोझोदावासीयांनी अनुभवला.
अधिक माहिती अशी की, शैलजा व किशोर मोतीराम चौधरी (मूळ रा.आमोदा, ता.यावल ह.मु.वापी, गुजरात) यांचा अभियंता असलेला मोठा मुलगा मयूर आणि कै.आशा व वसंत इच्छाराम महाजन (रा.खेडी, ता.रावेर, ह.मु.नाशिक) यांची कन्या शीतल सोबत ३० मे २०२१ रोजी पार पडला. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. लग्नानंतर अवघ्या ४२ दिवसांत म्हणजेच १२ जुलै २०२१ रोजी कंपनीत झालेल्या स्फोटात मयूर गंभीररीत्या जखमी झाला. उपचार घेताना १७ जुलै २०२१ रोजी काळाने त्याच्यावर झडप घातली. मात्र, या ४७ दिवसांमध्ये सासू-सासऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमाने शीतल माहेरी न जाता सासरीच थांबली. सासू-सासऱ्यांनी तिला सून न मानता मुलीप्रमाणे वागणूक दिली. शीतलला विश्वासात घेऊन तिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. हा विवाह २४ एप्रिलला संगीता व रेवा भगवान धांडे (रा.रोझोदा ता.रावेर) यांचा मुलगा भूषण (हेमराज) यांच्यासोबत पार पडला.