जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील रहिवासी तथा भाजयुमो शाखाध्यक्ष तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान सावदा ते पिंपरुड रस्त्यावर घडला. गणेश अशोक कोळी (वय ३५)असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, गणेश कोळी वय (वय ३५) आणि विक्की सोनवणे (रा.बामणोद ता.यावल) हे कामानिमित्त भुसावळ येथे गेले होते. काम आटोपून परत येताना सावदा ते पिंपरुड रस्त्यावर त्यांची दुचाकी (एमएच.१९-डी.ए.९५२०) आणि कारची (एमएच.१९-बीजे.०३८२) या दोन वाहनांची धडक झाली. त्यामुळे दुचाकी सुमारे ४०० मीटरपर्यंत फेकली गेली. त्यात दुचाकीवरील गणेश व विक्की हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी शासकीय रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी फैजपूर येथील डाॅ.खाचणे यांच्या दवाखान्यात नेले. मात्र, गणेश कोळीची प्रकृती अधिक खालावल्याने त्यास जळगाव येथे खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. दुर्दैवाने तेथे त्याची प्राणज्योत मालवली. विक्की सोनवणे याच्यावर फैजपूर येथे उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. मृत गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आहेत.