विजेची टंचाई, शहरात मात्र दिवसाही ८० पथदिवे सुरू
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । राज्यभरात तापमान वाढीमुळे विजेची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणने कृषी फिडरसह घरगुती जोडणीच्या फीडरवर भारनियमन सुरू केले आहे. या काळात विजेची बचत करणे गरजेचे असताना पालिका मात्र शहरात २४ तास पथदिवे सुरू ठेवून विजेची उधळपट्टी करत आहे.
राज्यात वीजटंचाईने भारनियमन सुरू झाले. त्यास भुसावळ शहर अपवाद नाही. या काळात विजेची बचत गरजेची असताना शहरातील प्रोफेसर कॉलनी, महाराणा प्रताप विद्यालयामागील भाग, भवानी पेठ, नमस्कार मंडळ भाग, गंगाराम प्लॉट, वाल्मीक नगर, रमाबाई आंबेडकर नगर आदी परिसरातील किमान ४० खांबांवरील ८० पथदिवे २४ तास सुरु आहेत. आठ दिवसांपासून हे दिवे सुरु असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी पालिकेकडे केल्या. पण, उपयोग झालेला नाही. ‘दिव्य मराठी’ने या प्रकाराची माहिती घेतली असता २४ तास दिवे सुरु राहणाऱ्या भागात पथदिव्यांची जोडणी कंझ्युमर लाइनवर केली आहे. ही जोडणी परस्पर केलेली असल्यास महावितरणचे आर्थिक नुकसान होत आहे. ही जोडणी पुन्हा पथदिव्यांच्या लाइनवर का नाही? याबाबत महावितरणने दखल घेणे गरजेचे आहे.