जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । यावल शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाखासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील पोलीसांत पतीसह एक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील महाजन गल्लीत माहेर असलेल्या सोनाली संदीप गुरव (वय २५) यांचा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील संदीप रतिलाल गुरव यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या सुरुवातीचे एक वर्ष चांगले गेल्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर मुलगी झाली. दरम्यान मुलगी झाल्याची नाराजी व्यक्त करत पतीने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यानंतर सासूने दमदाटी केली. “माहेरहून टेलरिंग दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये आणावे तरच तुला मी नांदवेल.” असे सांगून मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता यावल येथील माहेरी निघून आल्या. रविवार, दि. १० एप्रिल रोजी त्यांनी या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती संदीप रतिलाल गुरव, सासू लताबाई रतिलाल गुरव यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असलम खान करीत आहे.