जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गंत केंद्राच्या समितीकडून शहरातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता दोन वेगवेगळे पथक शहरात दाखल झाले. यात एका तीन सदस्य असलेल्या समितीकडून शहरातील विविध भागातील साफसफाईची तपासणी केली जाणार असून दुसऱ्या २ सदस्य असलेल्या समितीकडून शहरातील शौचालयांची तपासणी केली जाणार आहे. दोन दिवस तपासणी केल्यानंतर समितीकडून गोपनीय अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गंत जळगाव महापालिकेने हगदारी मुक्त शहरच्या दुसऱ्या मानांकनासाठी (ओडीएफ ++)सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने केंद्राच्या दोन वेगवेळ्या पथकांकडून शहरातील विविध भागांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. या समितीच्या सदस्यांना मनपाकडून ४ वाहने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी दोन सदस्य शहरातील सार्वजनिक शौचालयांची तपासणी करण्यात आली. शहर पोलिस स्टेशन जवळील सुप्रिम कंपनीचे टॉयलेट, उद्यानातील शौचालय, महापालिकेच्या इमारतीमधील शौचालय अशा विविध ठिकाणी त्यांनी पाहणी केली तर, स्वच्छ सर्वेक्षणच्या टीमने इंद्रप्रस्त नगर, शिवाजी नगर, शाहू नगरसह शहरातील वेगवेगळ्या भागात त्यांना वरीष्ठांकडून प्राप्त लोकेशन नुसार त्यांनी पाहणी केली.