जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । भारतीय समाजव्यवस्था नियाेजित पद्धतीने जात आणि धर्मात अडकवून लाेकशाहीला धाेका पाेहाेचवण्याचे काम धर्मांध लाेक करताहेत. देशातील युवकांनी त्यांच्यापासून सावध राहून जातीची चाैकट माेडून माणसा-माणसांतील अंतर कमी करावे. निरपेक्ष भावनेने काम करण्याचा विडा प्रत्येकाने उचालयला हवा, असा सल्ला साहित्यिक डाॅ. मिलिंद बागूल यांनी दिला.
येथील शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यार्थी विकास विभागांतर्गत विशेष उपक्रम विद्यार्थी मुले व मुली व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा नुकतीच पार पडली. यात ‘जातीय सलोखा “या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बाेलत हाेते. जातीच्या चौकटीत तरुणांना अडकवले जाते. त्यांनी जातीची चौकट मोडायला पाहिजे. असा सल्ला डाॅ. बागूल यांनी दिला. प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे यांनीही मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.प्रियंका बऱ्हाटे, डॉ.राजकुमार लोखंडे उपस्थित होते. प्रा. देवयानी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.