शुल्क भरल्याशिवाय कांग धरणातून आवर्तन नाही
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । कांग धरणातून आवर्तन सोडावे अशी मागणी नदीकाठच्या गावांकडून होत आहे. काही ग्रामस्थांनी यासंदर्भात आमदार गिरीश महाजन यांची भेटही घेतली आहे. मात्र, आवर्तनासाठी शुल्क भरल्याशिवाय कांग धरणातून आवर्तन सोडणे शक्य नसल्याची माहिती पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांनी आमदार गिरीश महाजन यांना दिली. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आमदारांनी सांगितले.
आवर्तन सोडल्यास या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटतो
आवर्तन सोडल्यास फत्तेपूर, टाकळी, मेहेगाव, निमखेडी, जळांद्री, सामरोद, टाकरखेडा, ओझरसह अनेक गावांतील गुरांच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. त्यामुळे एप्रिल व मे या दोन महिन्यात पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतींकडून होते. यंदाही कांग नदीकाठच्या गावातील पदाधिकाऱ्यांनी आमदार महाजन यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती केली. त्यामुळे आमदारांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पाणी सोडण्याची सूचना केली. नदीकाठच्या गावांनी आमदार महाजन यांचेकडे पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र एक क्युबिक मिटरसाठी एक लाख ३५ हजार रूपये भरावे लागणार आहे. ग्रामपंचायतींना गेल्यावर्षीचे एक लाख ३५ हजार रूपये व यंदाचे तेवढेच मिळून दोन लाख ७० हजार रूपये भरावे लागणार आहेत.