⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

रावेरमध्ये दगडफेक! पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वातावरण नियंत्रणात

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ जानेवारी २०२४ । सावदा शहरात झालेल्या दगडफेकीची घटना ताजी असताना रावेरमध्येही दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रावेर शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. शोभायात्रा थांबविण्यात आली असून परिसरात पोलिसांनी तात्काळ कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सध्या वातावरण नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबत असे की, अयोध्येत नव्यानं बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात उद्या म्हणजेच २२ जानेवारीला प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याचे औचित्य साधून आज रविवारी रावेर शहरातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. थोडा वेळापूर्वीच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी या शोभायात्रेला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी पूजन करतांनाच वाजंत्रीच्या तालावर ठेका देखील धरला.

दरम्यान, यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास ही शोभायात्रा भोईवाडा परिसरातून पुढे नाला भागात येत असतांना अज्ञात टवळाखोरांनी जोरदार दगडफेक सुरू केली. यामुळे शोभायात्रेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या शोभायात्रेच्या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त होताच. यामुळे येथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ दगडफेक करणार्‍यांचा शोध सुरू केला आहे. परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून कुणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास न ठेवता कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी रावेरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर रावेर येथील सहायक पोलीस निरिक्षक श्री. अडसूळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे.