जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात अमळनेरचे कलारसिक नेहमीच अग्रेसर राहत असताना यंदाच्या गुढीपाडव्याला प्रथमच “सांज पाडवा”2022 चे आयोजन शहरात करण्यात आले. असून या माध्यमातून नाशिक येथील सुप्रसिद्ध अमोल पाळेकर यांच्या “साद स्वरांची” या कार्यक्रमाची मेजवानी अमळनेरकर रसिकांना मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप आणि माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती विनोद पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा रसिकांच्या मनाला भावणारा सुमधुर मराठी-हिंदी गाण्यांचा अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नाशिक येथील अमोल पाळेकर यांचा “साद स्वरांची” हा कार्यक्रम अत्यंत सुप्रसिद्ध आणि दर्जेदार असून यात गायक टीम मध्ये सोनल पडाया (निवेदिका) तसेच ज्योती केदारे, अमित पगारे आणि वादक म्हणून देवानंद पाटील, शुभम जाधव, निखिल खैराते, रोहित कटारे यांचा समावेश आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, न्यू प्लॉट, अमळनेर येथे दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमळनेरच्या सांस्कृतिक नजराण्यात भर टाकणारा आणि तळपत्या उन्हात गारवा देणारा हा कार्यक्रम असल्याने सर्व महिला भगिनी आणि पुरुष बांधवांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप आणि विनोद पाटील मित्र परिवाराने केले आहे.