यावलात मोकाट डुकरांचा धुमाकूळ; तात्काळ बंदोबस्त करा : नागरिक
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल नगर परिषद हद्दीतील सर्व कॉलनी परिसरात मोकाट डुकरांचा धुमाकूळ वाढला असून यामुळे येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहे. याबाबत येथील नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि. 24 मार्च रोजी लेखी तक्रार करून मोकाट डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे शहरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यावल नगरपरिषद हद्दीत असलेल्या आयेशानगर, गणपती नगर, फातेमा मस्जिद परिसर, गंगा नगर, तिरुपती नगर, प्रभू लीला नगर, फालक नगर, चांद नगर वासुदेव नगर, श्री स्वामीनारायण मंदिर परिसर इत्यादी परिसरात मोकाट डुकरांच्या मोठ्या वाढत्या संख्येमुळे रहिवासी नागरिकांना त्रास होत आहे. मोकाट डुकरे मंदिर मज्जिद व राहते घरा मधे घुसून नासधूस करीत आहेत. यामुळे विटंबना होत असून वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपरिषदेने तात्काळ शहरातील सर्व भागात डुकरांचा वाढलेला धुमाकूळ हैदोस याची विल्हेवाट लावावी. अशी लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
या प्रसंगी अशपाक शहा अब्दुल गफ्फार शहा, हाजी शेख सादिक, शेख जुबेर, वसिम पटेल, शेख नजीब, आमिर शेख आमीन, सरफराजोद्दिन, आसिफखान, शेख कमालोद्दीन अमिनोद्दिन, शोएब खान, हाफिज खान रऊफखान, अजित पटेल व गणी पटेल उपस्थित होते.