जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । पत्रिका म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट चित्र उभं राहतं. वधू वरांसोबत जवळच्या नातेवाईकांची नावं, विवाह स्थळाचा पत्ता, विवाहाची तारीख, मुहूर्त असं लग्नपत्रिकेचं स्वरुप असतं. मात्र मुळ जैतपीर ह.मु. झाडी येथील तरूणाच्या लग्नाची पत्रिका सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतेय. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झालीय. पत्रिकेत एखाद नाव सुटले तर राग, नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होत असतो. हाच प्रसंग टाळण्यासाठी व विवाह समारंभ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पुण्यस्मरण, आशिर्वाद, प्रेषक, संयोजक, व्यवस्थापक, कार्यवाहक अशा रकान्यांमध्ये कोणाचीच नावे न टाकता शब्दसुमनांनी मनधरणी करत परंपरेला फाटा देण्यात आला आहे.
लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. त्यामुळे या सोहळ्याची वधुवरांप्रमाणेच त्यांचे कुटुंबियही आतूरतेने वाट पाहत असतात. आपल्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी आईवडील जीवाचे रान करतात. लग्नाची तारीख आणि मुहूर्त ठरल्यावर सर्वात आधी तयार केली जाते लग्नाची निमंत्रण पत्रिका. हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात आधी परमेश्वराला म्हणजेच कुलदेवतेला आमंत्रण पत्रिका देऊन मगच नातेवाईक, मित्रमंडळींना आमंत्रण देण्यास सुरूवात केली जाते.
मात्र, याच पत्रिकेत नजरचुकीने जवळच्या नातलगाचे, भाऊबंदकीतील कोणाचे नाव जर सुटून गेले तर मोठा गदारोळही पाहण्यास मिळतो. रूसवे, फुगवे, लग्नात भांडणतंटे, कायमचा दुरावा सुद्धा यातून उद्भवतो. झाडीच्या शिंदे परिवाराने हटके लग्न पत्रिका तयार करत समाजापुढे चांगला पर्याय ठेवलेला आहे.
पुण्यस्मरणाच्या रकान्यात
घेऊन गरूड भरारी गेले निघुनी स्वार्गाशी*
आज जानवते तुमची अपूर्णता मंडपाशी
आशिर्वादच्या रकान्यात
देवाधिका समभाव असे मनी।
आशिर्वाद द्यावा मंगल क्षणी।।
प्रेषकांच्या रकान्यात
अष्टविनायका आधी तुम्हा नमन। मंगल कार्यात आधी तुमचा मान आदरणीय सर्व जवाई पाहूणे मंडळी आतेष्ठ व नातेवाईक मंडळी.
संयोजकाच्या रकान्यात
संयोजकांचा चतुर खेळा
पूर्व पुण्याईचा घातला मेळ।
व्यवस्थापकाच्या रकान्यात
व्यवस्थापकांना विनंती थोडी
मंगल कार्यात आणावी गोडी।।
कार्यवाहकाच्या रकान्यात
कार्यवाहकास शक्ती देई।
मंगल कार्यास तडीस नेई
अशा पध्दतीने त्यांनी शब्दसुमनांच्या मळा मांडत गोतावळ्याला सन्मानित केले आहे.
तालुक्यातील झाडी येथील योगेश व रामेश्वर खु.येथील आरती यांच्या लग्नाची ही हटके पत्रिका आहे. नियोजित वधू-वर हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. २० मार्च रोजी त्यांचा विवाह झाडी येथे संपन्न होणार आहे.