दुर्दैवी : कन्या आली पण मातेने घेतला जगाचा निरोप, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडली घटना

मार्च 16, 2022 5:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । कन्येला जन्म दिल्यानंतर मातेने पाचच दिवसात जगाचा निरोप घेतला. सोनल तुषार भोसले असं मयत मातेचे नाव आहे. दुःख अधिकच वेदनादायी बनविणारी बाब म्हणजे लग्नाच्या वाढदिवशीच ही दुर्घटना घडली. एकीकडे कन्यारत्न जन्माचा आनंद व दुसरीकडे मातेचा मृत्यूचे दुःख असा विचित्र प्रसंग भडगाव तालुक्यातील आमडदे येथील भोसले कुटुंबावर ओढवला.

sonal tushar bhosale jpg webp

याबाबत असे की, प्रगतशील शेतकरी मनोज भोसले यांची सून व अभियंता तुषार यांची पत्नी सोनलचा असा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सोनल ही पिंप्रीहाट येथील संजय विनायक सोनवणे यांची कन्या. त्याचा विवाह १२ मार्च २०२० रोजी झाला होता. गेल्या आठवड्यात मनोज भोसले यांच्या कन्येचे लग्न होते.कुटुंबात लग्न व त्यानंतर लहान बाळाचे आगमन होणार होते. यामुळे संपूर्ण भोसले कुटुंब आनंदात होते. मात्र या आनंदावर सोनलच्या मृत्यूने विरजण पडले. सोनलच्या पश्चात कन्या, पती, सासू-सासरे, नणंद, आई वडील, भाऊ-बहीण आहे.

प्रसूतीदरम्यान सोनलचे सीझर झाल्यानंतर तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला, यानंतर मात्र सोनलची तब्येत खालावली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र सोनलला वाचविण्यात यश आले नाही. प्रसूतीनंतर पाच दिवसांनी १२ मार्च रोजी सोनलवर काळाने झडप घातली. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच ही दुर्घटना घडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now