जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । जिल्ह्यात वयोवृद्धांना गाठत काहीतरी थापा मारत त्यांच्याकडील ऐवज लुटणाऱ्या भामट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. माध्यमातून याबाबत वृत्त प्रकाशित होताच मेहरूण मधील एका ७२ वर्षीय बाबांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. संशयिताला पाहताच त्यांनी त्याला ओळखले. आपल्या लुटणारा हाच असल्याची खात्री पटल्यावर रमेश विठ्ठल चाटे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वयोवृद्ध नागरिकांना लुटण्याच्या घटना घडत होत्या. आरोपी मिळून येत नसल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विशेष पथक त्याच्या मागावर होते. गेल्या आठवड्यात पथकाने टिपू उर्फ इब्राहिम सत्तार मन्यार, वय-३० वर्ष रा.वराडसिम बाहेरपुरा ता.भुसावळ याला राहत्या घरून अटक केली होती. जिल्ह्यातील काही गुन्ह्यांची त्याने कबुली दिली होती. वृद्धांना लुटणाऱ्या आरोपीला अटक अशा बातम्या दुसऱ्या दिवशी माध्यमातून प्रकाशित झाल्या होत्या. मेहरूण परिसरातील संत ज्ञानेश्वर चौकात राहणारे रमेश विठ्ठल चाटे वय-७३ यांना देखील त्याबाबत समजले. आपली देखील अशाच पद्धतीने लूट झाली असल्याने रमेश चाटे हे माहिती घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचले. संशयित टिपू मन्यार याला त्यांनी ओळखले.
दि.७ जानेवारी २०२२ रोजी रमेश चाटे हे घराकडून काशिनाथ चौकाकडे नातेवाईकाला देण्यासाठी ८० हजार रुपये रोख घेऊन पायी जात होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या एका तरुणाने त्यांना पुढेपर्यंत सोडण्याचा बहाणा केला. काही अंतरावर पुढे पोलीस उभे आहेत, तुमच्याकडे काही असेल तर माझ्याकडे द्या असे त्याने सांगितले. चाटे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत ८० हजार रोख, हातातील ७ ग्रॅम आणि ५ ग्रॅम अंगठी असा एकूण १ लाख ३८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल त्याला दिला. सर्व ऐवज बॅगेत ठेवल्यावर बाबा, तुम्ही इथेच थांबा मी ५ मिनिटात येतो असे सांगून तो निघून गेला. बराच वेळ वाट पाहिल्यावर देखील तो न आल्याने आपली फसवणूक झाल्याची त्यांची खात्री पटली.
वृद्धांना लुटणाऱ्या आरोपीबद्दल माहिती मिळाल्यावर रमेश चाटे यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. संशयित इब्राहिम उर्फ टिपू मन्यार याला त्यांनी ओळखले. चाटे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आनंदसिंग पाटील, योगेश बारी करीत आहे.