आमदारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, त्यांना फक्त टक्केवारीच्या कामात रस : अमोल शिंदे
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । ‘ज्या’ शेतकऱ्यांच्या जीवावर ते आमदार झालेत ‘त्या’ शेतकऱ्यांनाच त्यांनी वाऱ्यावर सोडले. त्यांच्याकडून जर शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसतील तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आमदारांना फक्त टक्केवारी मिळत असलेल्या विकास कामांमध्ये रस असून शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या मूलभूत सोयी-सुविधा व समस्यांवर स्पष्टपणे दुर्लक्ष करीत आहेत. ते फक्त ठेकेदार मित्रांचे आमदार नसून सामान्य जनतेचे व शेतकऱ्यांची देखील आहेत त्यांनी हे देखील भान ठेवावे. असा टोला पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांना लगावला आहे.
महावितरणाच्या आडमुठ्ठे धोरणामुळे होरपळलेल्या बळीराजासाठी भारतीय जनता पार्टी व भाजपा किसान मोर्चातर्फे पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी बांधवांना ऐन रब्बी हंगामात वारंवार महावितरण कडून भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यां विरोधात हे लक्षवेधी आंदोलन होते. पाचोरा भडगाव तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखाली अटल भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय पासून घोषणाबाजी करीत छ.शिवाजी महाराज चौकात जाऊन या नाकर्ते सरकारच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन केले.
मागण्या अश्या
ट्रान्सफार्मर (डी.पी.)वरून होणारी वीज कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी, कृषिपंपांचा वीजपुरवठा ८ तास नियमित व योग्य दाबाने अखंडित देण्यात यावा, नादुरुस्त ट्रान्सफार्मर डी.पी. ४८ तासांत दुरुस्त करून देण्यात यावी, जुलमी पद्धतीने होणारी वीज बिल वसुली तात्काळ थांबावी.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस व जि.प.सदस्य मधुकर काटे व भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी देखील स्थानिक आमदारांसह राज्य शासनावर जोरदार टीका केली. या प्रसंगी भारतीय जनता पार्टी पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि युवा मोर्चा ते सर्व पदाधिकारी तथा पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
पहा व्हिडिओ :