दंगल : शनीपेठेत दगडफेक, वाहनांचे नुकसान, एक जखमी

मार्च 14, 2022 12:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । शहरातील शनिपेठ परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास काट्याफैल आणि गवळीवाडा भागात दोन गटात तुफान दगडफेक झाली. या घटनेत दोन वाहनांचे नुकसान झाले असून एक होमगार्ड जखमी झाला आहे.

shanipeth riot stone pelting

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काट्याफैल परिसरातील एका तरुणाने व्याजाने घेतलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी दुसऱ्या गटातील तरुण आले होते. पैसे देण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद हाणामारीपर्यंत पोहचला. काही क्षणात वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले.

भिलपुरा चौक ते ममुराबाद नाका रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी दगड, खडी टाकलेली आहे. एका गटाकडून दगडांचा वापर केला गेल्याने दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात एक दुचाकी, एक रिक्षा व चारचाकीचे नुकसान झाले आहे. तर दगडफेकीत होमगार्ड जखमी झाला. दोन्ही बाजुने जोरदार दगडफेक झाल्याने रस्त्यावर दगडांचा खच पडला होता.

घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीस ठाण्यातील मोजक्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली मात्र जमाव मोठा असल्याने ते काहीही करू शकले नाही. परिस्थितीची माहिती घेत पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळ गाठले. पथकासह शीघ्र कृती दलाच्या तुकडीला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलिसांचा फौजफाटा येताच दोन्ही गटाने पळ काढला. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल नसला तरी संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, परिसरात शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पहा थेट प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/2156891154449634

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now