जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून याची पूर्ण जबाबदारी गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा यांनी उचलली आहे.जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सिव्हील सर्जन एन. एस. चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे निर्देश दिलेत.
सध्या कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला असून रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमिवर, पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या विनंती नुसार आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी या कामाचा आढावा घेत निर्देश दिले.२-३ दिवसात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
या कोविड केअर सेंटरमध्ये ३० जनरल बेड असतील. यासोबत येथे १५ ऑक्सीजन बेड आणि ५ मिनी व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. याचा परिसरातील कोरोनाच्या रूग्णांना उपचारासाठी उपयोग होणार आहे. विशेष बाब म्हणजे या कोविड केअरच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा हे संयुक्तरित्या उचलणार आहेत. अर्थात, हे कोविड केअर सेंटर लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार हे सेंटर उभारण्यात येत आहे.
दरम्यान, आज पाळधीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक अमोल कासट, गोपाल कासट, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. नरेश पाटील, डॉ.सी.एस.पाटील, ग्राम पंचायत सदस्य अरविंद मानकरी, मच्छीन्द्र साळुंके, गुलाब भाऊ फाउंडेशनचे व सुगोकीचे पदाधिकारी , आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होते.