जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून एकाच्या हातातील मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेतील फिर्यादी शौचालयात गेला असता दोघा आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. दोघांपैकी एक त्याच्यासोबत आत गेला व एक बाहेर थांबला. फिर्यादी बाहेर आल्यानंतर बाहेर थांबलेल्या इसमाने आपण पोलीस असल्याची त्याला बतावणी करत त्याच्यावर रुबाब सुरु केला. आरोपींची बारीक हेअर कटिंग बघून फिर्यादी घाबरला. दोघा आरोपींनी शिताफीने त्याचा मोबाईल आपल्या ताब्यात घेत तेथून पलायन केले होते.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी करत होते. तांत्रिक मदतीच्या आधारे जहीर महंमद नूर महंमद (28) रा. भिलपुरा चौक मरिमाता मंदिराजवळ जळगाव आणि जुबेरखान वाहब खान (21) रा. इस्लामपुरा जळगाव या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. गुन्ह्यातील मोबाईल दोघांकडून हस्तगत करण्यात आला आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. दीपक शांताराम पाटील, पोलीस नाईक प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, पो. कॉ. सचिन महाजन, चालक अशोक पाटील, हे.कॉ. संदीप सावळे, पो.कॉ. ईश्वर पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. दोघा आरोपींना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.