⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | उपमहापौर, बंडखोर नगरसेवक आ.राजुमामांचे समर्थक

उपमहापौर, बंडखोर नगरसेवक आ.राजुमामांचे समर्थक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२१ । चेतन वाणी । शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या विरोधात बंड पुकारत भाजपातून बाहेर पडून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणारे आणि शिवसेनेच्या जोरावर उपमहापौरपदी विराजमान झालेले कुलभूषण पाटील यांच्यासह काही बंडखोर नगरसेवक अद्यापही राजे मामांचे समर्थक आहेत. आ.भोळे यांच्या समर्थनार्थ तयार करण्यात आलेल्या व्हाट्सअँप ग्रुपशी ते अद्यापही जुळलेले आहेत.

जळगाव शहर महानगरपालिका महापौर निवड निमित्त अनेक राजकीय बदल शहरवासियांना पाहायला मिळाले. भाजपने आजवर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या २७ नगरसेवकांनी आ.राजूमामा भोळे यांच्या विरोधात प्रतिक्रिया देत स्वतंत्र गट स्थापन करीत असल्याची घोषणा केली. इतकेच नव्हे तर त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला महापौर निवडीसाठी मतदान करून त्यांना विजयी केले. महापौर शिवसेनेचा असला तरी उपमहापौर म्हणून भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे निवडून आले.

आ.राजूमामा भोळे विश्वासात घेत नाही, काहीही बोलतात, शहरात विकास होत नाही असे अनेक कारणे देत या बंडखोरांनी वेगळी वाट धरली. भाजपकडून नैतिकतेचा मुद्दा पुढे करत बंडखोरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती परंतु एकाही बंडखोराने राजीनामा दिलेला नाही. बंडखोरांवर कारवाईसाठी भाजपकडून नाशिक विभागीय आयुक्तांकडे तीस हजार पानांची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. भाजपातून बाहेर पडलेल्या बंडखोरांना पक्षाकडून कोणत्याही बैठकीसाठी बोलावण्यात येत नाही तसेच त्यांना व्हाट्सअँप आणि इतर सोशल मीडिया ग्रुपमधून बाहेर करण्यात आले होते.

गेल्या विधानसभा निवडणूकप्रसंगी जळगाव शहराचे आ.राजूमामा भोळे यांच्या समर्थकांचा व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्यात आला होता. आ.भोळे, डॉ.धर्मेंद्र पाटील हेच या ग्रुपचे ॲडमिन आहेत. भाजपातून बंडखोरी केलेले विद्यमान उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक किशोर बाविस्कर हे अद्यापही त्या ग्रुपमध्ये आहेत. दोघेही स्वतःहून ग्रुप मधून बाहेर पडलेले नाहीत किंवा कोणत्या ॲडमिनने त्यांना बाहेर काढले नाही त्यामुळे या बंडखोरांचे आमदारांना छुपे समर्थन आहे का? किंवा आमदार त्यांना पाठीशी घालत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जळगावच्या राजकारणात केव्हा काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही. उद्या राज्यात सरकार बदलले तर हेच बंडखोर पुन्हा माघारी फिरण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे नेते मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना पुन्हा सामावून देखील घेऊ शकतात. तूर्तास ‘ये अंदर की बात हैं, उपमहापौर मामा के साथ हैं।’ असे म्हणायला काही हरकत नाही.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.