शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे नवीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना लोकाभिमुख आणि पारदर्शक वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची रचना तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार रोजी नवीन वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. विजय गायकवाड यांची तर उप वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. योगिता बावस्कर, डॉ. नरेंद्र पाटील यांची नेमणूक देखील जाहीर केली.
रुग्णालयाच्या कारभारात सुसूत्रता यावी, रुग्णांना उपचार घेतांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी डॉ. जयप्रकाश रामानंद प्रयत्नशील आहेत. पुढील काळात मनुष्यबळाचे योग्य पद्धतीने नियोजन करून पारदर्शक लोकाभिमुख रुग्ण सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत आहे. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची कार्यपद्धती बदलवली जात आहे. गुरुवारी दि. ६ जानेवारी रोजी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी यांची दुपारी विशेष बैठक घेऊन त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणींवर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
वैद्यकीय अधिकारी यांना अडचणी आल्यास उप वैद्यकीय अधीक्षक आणि त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडवतील. अशा स्वरूपात वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. प्रत्येकाला त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून सर्व हालचालींवर अधिष्ठाता हे स्वतः लक्ष ठेऊन असणार आहेत. गुरुवारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड यांची तर उप वैद्यकीय अधीक्षक म्हणून जनऔषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर आणि स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून डॉ. नरेंद्र पाटील यांची निवड अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजात आता सुसूत्रता व पारदर्शकता अधिक येईल असा विश्वास अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा :