जळगाव जिल्हा

देवकर रुग्णालयात मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । दिवाळीच्या काळात खरेदी करून घरी परतणाऱ्या महिलेचा गंभीर अपघात झाला.डोक्याला मार, थेट मेंदूत रक्तस्राव झालेला अशा अवस्थेत सायंकाळी महिलेला गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णांवर उपचार सुरू केले. रुग्णाचे सिटीस्कॅन झाल्यानंतर मेंदूत रक्तस्राव झाल्याचे लक्षात आले. आणि डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.तोपर्यंत पहाटेचे तीन वाजले होते,पण तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे असल्याने पहाटे तीन वाजताच जखमी महिलेच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.आणि महिलेचे प्राण वाचविण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले.

बिलवाडी (ता जळगाव) येथील चित्राबाई पाटील या दिवाळीच्या खरेदीसाठी जळगाव येथे आल्या होत्या. खरेदी आटोपून मुलासोबत दुचाकीवरुन जात असताना त्यांचा अपघात झाला. अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. अशा अवस्थेत यांना सायंकाळी देवकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील समन्वयक डाॅ.नितीन पाटील व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मेंदूला मार लागल्याने रुग्णालयाच्या सिटी स्कॅन सेंटरमध्ये त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने प्रकृती गंभीर झाली होती. अशातच त्यांचा रक्तदाब अतिशय कमी झाला मात्र, शस्त्रक्रियेशिवाय रुग्ण वाचणार नाही, याची खात्री झाल्यावर डॉक्टरांनी पहाटे तीन वाजताच शस्त्रक्रियेची तयारी केली. त्यासाठी न्यूरो सर्जन डॉ. प्रशांत साठे, आयसीयू तज्ञ डॉ.प्रियांका पाटील, डॉ. स्नेहल गिरी, भूलतज्ञ डॉ.आशी अन्वर यांची टीम शस्त्रक्रियेसाठी सज्ज झाली.

चित्राबाई यांच्या मेंदुवर जवळपास सहा वाजेपर्यंत चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची स्मरणशक्ती जाऊ शकत होती किंवा त्या कोमात जाऊ शकत होत्या, याचे संपूर्ण खबरदारी घेत देवकर रुग्णालयातील डॉक्‍टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. आणि रुग्णाच्या नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला. शस्त्रक्रियेनंतर २८ दिवस आयसीयूमध्ये उपचार करून नुकताच चित्राबाई यांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी जीव वाचवल्याबद्दल रुग्णालयातील संपूर्ण स्टाफचे कौतुक करीत सर्वांना पेढे वाटप केले.

माझ्या आईचा पुनर्जन्म

चित्राबाई पाटील यांचे चिरंजीव व जामनेर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी सांगितले, की आमची आई वाचेल, याची आम्हाला शास्वती नव्हती. परंतु, देवकर रुग्णालयातील डॉक्टरांची तत्परता तेथील सर्व स्टाफचा समर्पण भाव यामुळे आमच्या आईचा नवा जन्म झाला. त्यामुळेच रुग्णालयातून सुट्टीच्या वेळी आम्ही डॉक्टरांचे आभार मानत आनंदाने रुग्णालयात मिठाई वाटप केली. देवकर रूग्णालयामुळे माझ्या आईचा पुनर्जन्म झाला, असेच आम्ही मानत आहोत.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button