खडसेंपाठोपाठ आता यांनी घेतली शरद पवारांची भेट, यावर झाली सविस्तर चर्चा
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुक निकाल जाहीर झाला असून, येत्या आठ ते दहा दिवसांत चेअरमन आणि व्हाइस चेअरमन निवड होणार आहे. त्यामुळे या पदांसाठी इच्छुक आपल्या रणनीतीत व्यग्र आहेत. बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक संचालक निवडून आले आहेत. दि. २४ रोजी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. तर गुरुवारी (दि.२५) माजी राज्यमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
यासंदर्भात माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी जिल्हा बँकेच्या निकालावर चर्चा करून माहिती जाणून घेतली. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, पक्षबांधणी या विषयांवरही चर्चा झाली. जिल्हा बँक चेअरमन निवडीसंदर्भात दोन्ही नेत्यांसोबत कुठलीही चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्याकडे कुठलेही पद मागावे लागत नाही. ते स्वतःहून योग्यवेळी न्याय व पदे देतात, असे त्यांनी सांगितले. खडसे यांच्यानंतर माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनीही नेत्यांची भेट घेतल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा बँक चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे, यावरून स्पष्ट होत आहे.