⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. जळगाव जिल्ह्यात कापसाला मिळाला तब्बल १६ हजार रुपये भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । गतवर्षी कापसाच्या (Cotton) उत्पादनात घट झाल्याने भर हंगामात कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून आले. बाजारपेठेतील मागणी आणि आयातीत घट होणार असल्याने यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव मिळण्याची शक्यता आहे. मात्र जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कापूस खरेदीच्या मुहूर्तालाच 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना बाप्पा पावला असल्याचं मानलं जात आहे.

या ठिकाणी मिळाला 16 हजारांचा दर
जळगाव जिल्ह्यातील बोदवड या ठिकाणी कापूस खरेदीचा मुहूर्त (१ सप्टेंबर रोजी) करण्यात आला. यावेळी बोदवड बाजारपेठ विक्रमी १६,००० हजार रुपये प्रति क्विंटल भाव काढण्यात आला आहे. मात्र, यावेळी केवळ 67 किलो कापूस या ठिकाणी खरेदी करण्यात आला. मागील वर्षी अतिवृष्टीचा कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. यंदा मात्र, कापसाचे पिक चांगले असल्यानं शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात केळीपाठोपाठ कापूस महत्वाचे पीक
महाराष्ट्रात केळीचे (Banana) सर्वाधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यातून होते. जळगावच्या केळीला केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी असते. केळीपाठोपाठ जिल्ह्यात कापूस पीक महत्वाचे मानले जाते. कापूस पिकात सहसा शेतकऱ्यांना नुकसान येत नसल्यानं पांढरे सोनं म्हणून कापूस पिकांकडे पाहिले जाते. कापूस खरेदीचा हंगाम अजून सुरु व्हायचा असला तरी अनंत चतुर्थी निमित्ताने कापूस खरेदी करण्याची खानदेशात परंपरा आहे. या परंपरेनुसार (31 ऑगस्ट) धरणगाव जिनिंग असो तर्फे कापूस खरेदी मुहूर्त करण्यात आला.

कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळाला
बोदवड बाजारपेठ: 16000 रुपये
सातगाव डोंगरी : 14 हजार 772 रुपये
बाळद : 11 हजार 551 रुपये
धरणगाव : 11 हजार 153 रुपये
कासोदा : 11011 रुपये
कजगाव : 11000 रुपये