⁠ 
सोमवार, मे 6, 2024

नव मतदार नोंदणीसाठी ९ डिसेंबरपर्यंत मुदत ; आता घरबसल्या करा अशी नोंदणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे.

राज्यात आता एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. त्यासाठी १ जानेवारी २०२४ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बीएलओंनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर जाऊनही मतदार नोंदणीचे काम केले आहे. आता ज्या तरुण-तरुणींना १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांनाही मतदार नोंदणीत सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत किंवा बीएलओंकडे त्यांना अर्ज देता येईल. त्याशिवाय स्वत:च्या मोबाईलवरून किंवा ऑनलाइन केंद्रांवरूनही मतदार नोंदणी शक्य आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी मतदार नोंदणी करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने केले आहे.

नवमतदार नोंदणी किंवा दुरुस्ती कशी करायची ?
नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाइन अॅप उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले अॅप डाऊनलोड करून घ्यावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता अॅपद्वारे नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करता येते. त्यासाठी योग्य कागदपत्रे अपलोड करावी लागतात. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या मतदारांना नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो. मृत मतदाराचे नाब नातेवाईक वगळू शकतात. तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येते. गुगल प्ले स्टोअरवरील https:// play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येईल.