⁠ 
रविवार, मे 19, 2024

चाळीसगावचे पीआय ऍक्शन मोडमध्ये, टवाळखोरांवर कठोर कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । आपल्या धडाकेबाज कामगिरीसाठी जिल्हाभरात ओळख असलेले तसेच अवघ्या काही दिवसांमध्येच चाळीसगावात गुन्हेगारीला आळा घालून गुन्हेगारांना वठणीवर आणणारे चाळीसगावचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी काल पुन्हा एका प्रेस नोटद्वारे चाळीसगावातील टवाळखोर मुलांवरती सक्त कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

शहर पोलीस स्टेशन तर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये असे म्हटले आहे की चाळीसगाव शहरातील काही कॉलनी परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानात आजूबाजूला तसेच मैदानामध्ये अंधारात काही मुले त्या भागात राहत नसताना शहरातील इतर ठिकाणाहून येऊन त्या ठिकाणी सिगारेट पिणे, दारू पिणे, व आणखी काही नशा करत बसलेले असतात. व ते सार्वजनिक शांतता भंग करीत असतात. स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध केल्यास त्यांना देखील न जुमानता ते शिवीगाळ व मारण्याची धमकी देत असतात. तसेच असे देखील निदर्शनास आलेले आहे की काही टवाळखोर तरुण हे शाळा कॉलेजेस भरण्याच्या वेळी तसेच सुटण्याच्या वेळी तसेच खाजगी क्लासेस सुरू होण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी मुलींची छेडखानी करण्याच्या उद्देशाने त्या परिसरात थांबलेले असतात. अशा टवाळखोर तरुणांकडून वेळप्रसंगी महिलांची छेडखानी, चैनस्केचिंग, अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहर पोलिसांनी अचानक राजपूत मंगल कार्यालय जवळील मोकळ्या मैदानात भेट दिली असता त्या ठिकाणी शहराच्या इतर भागात राहणारे काही तरुण विनाकारण थांबलेले मिळून आले. तसेच चार-पाच तरुण मैदानाच्या मध्यभागी अंधारात धूम्रपान करीत असताना मिळून आले. त्यापैकी काही तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यापैकी तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या वरती महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करून त्यांच्या पालकांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांना ताकीत देऊन सोडलेले आहे. यापुढे शहरात नियमित पद्धतीने अशी कारवाई करण्यात येणार आहे. जे टवाळखोर तरुण रात्री-अपरात्री कॉलनी परिसरातील मोकळ्या मैदानात किंवा शाळा कॉलेजेस च्या बाहेर तसेच खाजगी क्लासेसच्या बाहेर किंवा मार्गावर विनाकारण थांबलेले किंवा गोंधळ करताना किंवा सार्वजनिक शांतता भंग करताना मिळून येतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान शहर पोलीस ठाणे तर्फे सर्व पालकांना सुचित केले आहे की त्यांनीदेखील आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात उशिरा घरी येणाऱ्या पाल्याची चौकशी करावी. तसेच आपली मुले काही नशा करून घरी येत आहेत अगर कसे याबाबत देखील खात्री करून लक्ष ठेवावे. दरम्यान शहरांमध्ये असे काही टवाळखोर तरुण शांतता भंग करीत असल्याचे दिसून आल्यास नागरिकांनीदेखील शहर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातर्फे सांगण्यात आले आहे.