जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । दोन महिन्यांपासून भुसावळ शेतकी संघात धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे, मात्र अद्यापही हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांकडे कमी भावाने धान्य विक्रीची वेळ आली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन तातडीने हे खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून हमी भावाने मका, ज्वारी विक्रीसाठी भुसावळ शेतकी संघात ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात धान्य विक्री करावे लागत आहे. मक्यासाठी १ हजार ८७० व ज्वारीसाठी २ हजार ७३८ रुपये हमीभाव आहे, मात्र खुल्या बाजारात मका १,१०० ते १,२०० तर ज्वारी केवळ १२०० रुपये क्विंटलने खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मक्यात प्रतिक्विंटल ६०० रुपये तर ज्वारीत १४०० रुपयांचे नुकसान होत आहे.
अतिवृष्टीची भरपाई द्या
व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी दराने धान्य खरेदी केले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल धान्यामागे ६०० ते १४०० रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी भुसावळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी ज्वारीचा रंग काळा झाला आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ एफएक्यू दर्जाची ज्वारी खरेदी केली जात असल्यामुळे काळ्या ज्वारीला कवडीमोल दर मिळत आहे. ही ज्वारी देखील या केंदावर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी देखील होत आहे.