रावेर येथील पाच ग्रामसेवकांचे ‘अपंगत्व’ प्रमाणपत्र ठरले अवैध
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । रावेर पंचायत समिती कार्यालयांतर्गत सेवारत पाच ग्रामसेवकांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. सोयीच्या बदल्यांसाठी त्यांनी अपंगात्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याचे सांगितले जात आहे.
धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थायी वैद्यकीय मंडळाच्या पडताळणी वैधता समितीने हा निर्णय दिला आहे. या पाचही जणांना कोणत्याही प्रकारचे अपंगत्व नसल्याचा पडताळणी अहवाल समितीने सादर केला आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र अवैध असल्याचे स्पष्ट केले आहे. हा अहवाल १२ ऑक्टोबर रोजी रावेर पंचायत समिती कार्यालयाला प्राप्त झाला आहे. भाजप दिव्यांग आघाडीचे रजनीकांत बारी यांनी या तक्रारी केल्या होत्या. अन्य तीन ग्रामसेवकांबाबतही तक्रारी होत्या; परंतु त्यांच्याबाबतचा अहवाल अद्याप आला नसल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले.
पाच ग्रामसेवकांची नावे
नितीन दत्तू महाजन, राहुल रमेश लोखंडे, रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी, छाया रमेश नेमाडे व श्यामकुमार नाना पाटील, अशी या पाच ग्रामसेवकांची नावे आहेत.