⁠ 
बुधवार, मे 8, 2024

वादग्रस्त निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक, दीड वर्षापासून होते फरार

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ जानेवारी २०२४ | मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने निलंबित करण्यात आलेले जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. अखेर सोमवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ते पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आले आहे.

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणारी ऑडियो क्लीप व्हायरल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले चर्चेत आले होते. समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार किरणकुमार बकाले यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार हे दीड वर्षांपासून फरार होते. त्यांचे निलंबन करून नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू ते हजर न होता फरार झाले होते.

किरणकुमार बकाले यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे बकाले यांच्या पदरी‍ निराशा पडली होती. यातच पोलीस प्रशासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. अडचणीत वाढ होत असल्याने अखेर किरणकुमार बकाले यांनी सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून हजर झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्याकडे बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे.

बकाले यांची ऑडियो क्लीप व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजात मोठा असंतोष उसळला होता. बकाले यांच्या अटकेसाठी राज्यभरात आंदोलन देखील करण्यात आले होते. तसेच त्यांना बडतर्फ करण्याची मागणी देखील होत होती. अखेर दीड वर्षांनी किरणकुमार बकाले यांना अटक झाली असून दुपारी त्यांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.