जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । खोटेपणा उघडकीस आणल्याचा राग येऊन बापानेच मुलावर विळ्याने वार केल्याची घटना दि.१४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील सानेनगरात घडली. मुलावर धुळे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून याप्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील सानेनगरातील रहिवाशी प्रकाश राघो पाटील यांनी त्यांचा भाऊ शिवाजी पाटील यांना फोन करून आई आजारी आहे, तू लवकर ये असे सांगितले. याची खात्री करण्यासाठी शिवाजी पाटील यांनी पुतण्या रोहित पाटील याला याबाबत विचारले असता रोहित याने वडील खोटे बोलत असून आजीची तब्येत चांगली आहे, असे सांगितले. वडीलांचा खोटेपणा उघडकीस आणल्याने त्याचा राग येऊन प्रकाश पाटील यांनी मुलगा रोहित याच्या पाठीवर विळ्याने वार केला. हा वार त्याच्या कानाजवळ लागला. त्यानंतर प्रकाश पाटील हे रोहितला मारण्यासाठी पुन्हा त्याच्या धावले. यावेळी रोहितच्या आई व बहिणीने वेळीच हस्तक्षेप करून भांडण सोडविले.
जखमी रोहितला त्याच्या चुलत भावाने धुळे येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रोहितने दवाखान्यातून जबाब दिल्यामुळे वडील प्रकाश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.