धक्कादायक: सर्पमित्रालाच झाला सर्पदंश

नोव्हेंबर 15, 2021 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । शिरसोली येथे घराशेजारी निघालेल्या कोब्राला पकडताना सर्पमित्रालाच कोब्राने दंश केल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या कोब्राला घेऊन या सर्पमित्राने स्वतः दुचाकीवरून दहा किमी अंतरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठून उपचार घेतले. सुधीर जगन्नाथ सपकाळे असे या सर्पमित्राचे नाव आहे. सुधीर हा जळगाव येथील प्रजापत नगरातील रहिवासी आहे. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

sarp dansha jpg webp

सविस्तर असे की, जळगाव येथील प्रजापत नगरातील रहिवासी सुधीर सपकाळे हा तीस वर्षीय तरुण सर्पमित्र आहे. तो भाऊबिजेनिमित्त शिरसोली येथे गेला होता. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घराशेजारी साप निघाल्याने सर्पमित्राला बोलवा, असे शेजाऱ्यांनी सांगितल्यानंतर सुधीर याने आपणच सर्पमित्र असल्याचे सांगितले व काटेरी झुडपात असलेला कोब्रा पकडत असताना त्याच्या उजव्या पायाला कोब्राने दंश केला. यानंतर सुधीरने तो कोब्रा पकडून एका बरणीत ठेवला व तसाच स्वतः दुचाकी चालवत दहा किमी दूर जीएमसीत साडे अकराच्या सुमारास दाखल झाला. यावेळी राहुल पुडंलिक साळवे सोबत होता.

सर्पमित्राची प्रकृती गंभीर

• डॉ. स्वप्निल कळसकर यांनी प्रक्रिया पूर्ण करून सुधीर सपकाळे याला अतिदक्षता विभागात दाखल केले.

• सुधीरला कोब्राचा दंश झाल्याने त्याला चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधार येणे, रक्ताच्या उलट्या झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

• रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. कोब्राचे २० टक्के विष शरीरात गेले असून २४ तासांनंतर सुधीर धोक्याच्या बाहेर येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

 

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now