⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

कन्नड घाट आजपासून अवजड वाहतुकीसाठी खुला

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । दरड कोसळल्यामुळे तब्बल अडीच महिन्यांपासून बंद असलेला कन्नड घाट आज मंगळवार (ता. ९) सकाळी ८ वाजेपासून अवजड वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या मार्गामुळे दक्षिण भारताचे द्वार वाहतुकीसाठी खुले झाले असून यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यात ३१ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात ८ ठिकाणी दरड कोसळली होती. घाटात दरड कोसळल्याने घाटाची प्रचंड हानी झाली होती. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. घाटाच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे अडीच महिन्यांपासून घाट बंद होता. मात्र, आता ती पुन्हा सुरु होणार असल्याने वाहनधारक व पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे.

दरम्यान, कन्नड घाट दुरुस्तीसाठी शासनाकडून २१ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी आतापर्यंत १५ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण घाटाच्या कामांसाठी १२ महिन्यांची मुदत दिली आहे. घाटाच्या पायथ्यापासून ते वर ८ किलोमीटर भागात संपूर्ण डांबरिकरण केले आहे. दरी भागात भराव टाकला आहे. तसेच दोन्ही बाजूने रस्ता रुंदीकरण केला आहे.उर्वरित ६ किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप बाकी आहे. आता उर्वरित कामासाठी ९ महिन्यांचा काळ बाकी आहे. लहान डागडूजी हाेणार आहे. घाटाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा कंत्राटदारांचा मानस होता. परंतु, घाटातील लहान कामे पूर्ण करूनच पूर्ण क्षमतेने घाट सुरू कसा होईल, याकडे लक्ष देऊन काम पूर्णत्वास नेण्याचे काम केले.

कामासाठी रोज ४० मजूर
घाटातील कामासाठी दररोज ४० मजूर काम करत होते. तसेच मोठी १२ यंत्राचे यासाठी सहकार्य मिळत हाेते. या कामाची आखणी व पाहणी करण्यासाठी भोपाल व औरंगाबाद येथील राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे अधिकारी हजर होते.