केसीईच्या शिक्षणशास्त्र व शा.शि. महाविद्यालयात युवा स्वास्थ अभियानास प्रारंभ
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून युवा स्वास्थ अभियानास प्रारंभ करण्यात आला. महाविद्यालयातील प्रत्येक तरुणाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्यात २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान युवा स्वास्थ अभियान हाती घेण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता डॉ.संतोष चव्हाण (सहसंचालक जळगाव) यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यात महाविद्यालयातील चार जणींनी दुसरा डोस घेतला. लसीकरण मोहीम जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी, यासाठी महाविद्यालयाच्यावतीने सर्व प्राध्यापक वृंद प्रयत्न करीत आहेत. लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी डॉ.लिपिका प्रथ्यानी, स्टाफ नर्स कामिनी इसाळदे, सुनिता मुंडे, योगिता ठाकूर, आशा स्वयंसेविका संगीता ठाकूर यांचे सहकार्य लाभत आहे. महाविद्यालय परिसरातील ‘मदर टेरेसा प्राथमिक आरोग्य केंद्रात’ लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी, प्रा.अतुल गोरडे, मोहन चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.वंदना चौधरी व प्रा.प्रविण कोल्हे यांनी केले.